चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर टीका

कोल्हापूर : राज्यात आर्थिक, वैद्यकीय वाटोळे झाल्यावर शरद पवार केवळ नाराजी व्यक्त करतात. त्यांची ही नाराजी राज्याचे खूप मोठे नुकसान करणारे आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेले दोनतीन दिवस मातोश्री, वर्षां, सिल्वर ओक बंगल्याच्या वाऱ्या करीत आहेत. त्यावरून पवार राज्य सरकारच्या कारभारावर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरून आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. या मुद्दय़ावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की राज्यात आघाडी सरकार येऊन दीड वर्ष झाले. या कालावधीत शरद पवार यांनी राज्य सरकारवर आपला अंकुश ठेवला पाहिजे होता. ती भूमिका त्यांनी बजावलेली नाही. करोना टाळेबंदीचे निर्बंध कोणते असावेत; काय सुरू असावे, काय बंद असावे हे त्यांनी सरकारला सांगायला हवे होते. राज्याचे आर्थिक, वैद्यकीय वाटोळे झाल्यानंतर पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण याबाबत कारवाई तर दूर पण साधी नाराजी व्यक्त करायलाही त्यांनी वेळ लावला आहे. यामुळे महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संभाजीराजेंबद्दल साशंकता?

मराठा समाजाचे आंदोलन मूक असावे की आक्रमक यावरून आमदार पाटील व खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्यातील मतभेद दिसून आले आहेत. आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची भेट घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली. ती केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ‘तुम्ही मराठा समाजाचे राज्याचे राज्यव्यापी नेतृत्व करणार का,’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आमदार पाटील म्हणाले, ‘राज्यात मराठा आरक्षणासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. कोणा एका राजकीय नेत्यावर त्यांचे एकमत होण्यासारखे नाही. संभाजीराजे यांच्या नावावर एकमत होण्यासारखी परिस्थिती होती. पण संभाजीराजे यांनी या प्रश्नी सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. सरकार सकारात्मक असेल तर ते कागदावर का दिसत नाही? असा सवाल उपस्थित करून आमदार पाटील यांनी, ‘संभाजीराजे यांची भूमिका सतत बदलताना दिसते, असा उल्लेख करून लगेचच ‘त्यांनी अजूनही तशी स्थिती झालेली नाही,’ अशी सारवासारव केली. राज्याचे मराठा समाजाचे नेतृत्व करण्यात, त्या माध्यमातून श्रेय मिळवण्यात रस नसल्याचेही त्यांनी सांगितले.