टँकर-टेम्पो मधून गोव्याकडे जाणाऱ्या पाच जणांना शनिवारी कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पेठ वडगाव पोलिसांनी कणेगाव येथे चेकपोस्टवर आलेल्या दोन वाहनांना रोखून धरले. त्यातील एका टँकरमध्ये तिघे जण होते,तर दुसऱ्या टेम्पोमध्ये दोघे जण होते. त्यांनी अत्यावश्यक सेवाकार्यात असून गोव्याकडे निघालो असल्याचे सांगितले. पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता ते प्रवासी असल्याचे सिद्ध झाले. यापूर्वीही पोलिसांनी किणी, गडहिंग्लज, गोकुळ शिरगाव येथे टँकरमधून येणाऱ्या प्रवाशांना पकडले आहे. कोल्हापुरात आढळलेले करोना रुग्ण हे प्रामुख्याने मुंबई, पुणे व सिंधुदुर्ग येथून प्रवास करून आलेले होते.

अशा प्रवाशामुळे करोनाची लागण होत असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यातच अशाप्रकारे प्रवास केला जात असल्याचे उघड झाल्याने कोल्हापूरकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

२८ जणांचे अहवाल नकारात्मक

कोल्हापूर शहरामध्येही आता करोना तपासणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे. येथे तपासण्यात आलेल्या २९ पैकी २८ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. एक अहवाल संशयास्पद आहे. तो पुन्हा तपासणार असल्याचे शनिवारी सूत्रांनी सांगितले.

चाळीस विद्यार्थी परतले

राजस्थान येथील कोटा शहरात शिकणारे चाळीस विद्यार्थी शनिवारी कोल्हापुरात परत आले. कोटा येथे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या शिक्षणासाठी राज्यातील शेकडो विद्यार्थी गेले होते. त्यांना राज्यात परत आणण्याची प्रक्रिया राज्यशासनाच्यावतीने सुरू झाली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांंना पुणे येथे आणण्यात आले. तेथून दोन एसटी बस मधून त्यांना येथील सीपीआर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यामध्ये ९ मुली व ३१ मुलांचा समावेश आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यांना १४ दिवस स्वतंत्र अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना घरी जाऊ  दिले जाणार आहे. आपली मुले सुरक्षितपणे घरी परत आल्यामुळे पालकांच्या जीवात जीव आला. मुलांशी पाल्यांची नजरानजर झाली तेव्हा ते भावविवश झाल्याचे दिसून आले.

Story img Loader