ऑरेंज झोनमध्ये असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही प्रमाणात शिथिलता दिल्याचा फायदा बेजबाबदार नागरिकांनी उठवल्याने सोमवारी अवघ्या कोल्हापूर शहरात एकच गर्दी झाली होती. शहरातील व्यापारी पेठांमध्ये वाहने,खरेदीदार व विक्रेते यांची तोबा गर्दी उसळली होती. सामाजिक अंतराची नियमावली या गर्दीत पायदळी तुडवली गेली होती. या प्रकारावर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना साथीच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात आहे. चार करोना रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने कोल्हापूर करांमध्ये शैथिल्य आले आहे. याचा प्रत्यय सोमवारी अवघ्या कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव अशा शहरांमध्येही हजारो लोक खरेदी करण्यासाठी आणि अकारण भटकण्यासाठी रस्त्यांवर आल्याचे पाहायला मिळाले.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन करीत काही आस्थापने सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र याचा फायदा उठवत सर्वच प्रकारच्या दुकानदारांनी आपली दुकाने सकाळीच उघडली. दुकाने उघडल्यानंतर पाठोपाठ ग्राहकांनीही खरेदीसाठी गर्दी केली.
शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी या व्यापारी पेठा तसेच महापालिका परिसरामध्ये नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. लक्ष्मीपुरीमध्ये तर दिवाळीच्या बाजाराप्रमाणे खरेदीचे स्वरूप आले होते. शहरात सर्वत्र रस्त्यांवर दुचाकी—चारचाकी वाहनांतून नागरिक खुलेआम बागडत होते.
सामाजिक अंतराचे नियम कोणीही पाळत नव्हते. अनेकांनी तोंडाला मास्कही बांधलेले नव्हते.
नियमावली कडक करणार – मुश्रीफ
रस्त्यावर जत्रेप्रमाणे गर्दी करण्याच्या प्रकारावर सुजाण नागरिकांनी समाज माध्यमातून जोरदार टीका केली. त्याची दखल घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘रस्त्यावर गर्दी केल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज रस्त्यांवरील गर्दी पाहता पुन्हा एकदा शासनाला टाळेबंदी तीव्र करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला. करोना हद्दपार झाल्याच्या आविर्भावात लोकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले,की रस्त्यावरील गर्दी हाच खरा धोका असल्याने सामाजिक अंतर, सतत तोंडावर मास्क ठेवण्याचे नियम पाळले पाहिजेत.