भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत समाज माध्यमातून बदनामीकारक मजकूर अग्रेषित केल्याबद्दल कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्यावतीने मंगळवारी तक्रार करण्यात आली आहे. भाजपा कोल्हापूर महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आक्षेपार्ह मजकूर अग्रेषित करणाऱ्या सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत चिकोडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, राज्यात करोना संकटाचा मुकाबला केला जात असताना भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते युद्धपातळीवर यथाशक्ती सेवाकार्य करीत आहेत. याचवेळी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात बेकायदेशीर घटनांची मालिकाच सुरू आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सवंग प्रसिद्धीसाठी वारंवार शेरेबाजी व समाज माध्यमातून टीकाटिप्पणी केली जात आहे. भाजापाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करून बदनामीसाठी असे प्रकार सुरू आहेत. या सर्व घटनांना वेळीच चाप लावणे गरजेचे आहे. या घटनांचा कोल्हापूर भाजपाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊनही कोणतीच कारवाई झालेली दिसत नाही, अशी खंत चिकोडे यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकार्याने फेसबुकवर चंद्रकांत पाटील यांचे बदनामीकारक छायाचित्र अग्रेषित केले आहे. त्याला चिकोडे यांनी आक्षेप घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. समाज माध्यमात कोणत्या पद्धतीने चंद्रकांत पाटील यांची बदनामी केली आहे, याचे पुरावे व छायाचित्र पोलिसांकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader