वरुण राजा बरसला आणि कोरडाठाक पडलेला शहरालगतचा कळंबा तलाव तीन दिवसांत भरून वाहू लागला. जलयुक्त शिवारची यशकथा यानिमित्ताने करवीरच्या जनतेला पाहायला मिळत आहे. धुवाधार पाऊस पाहता हा तलाव लवकरच भरण्याची चिन्हे  स्पष्टपणे दिसू लागली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाने १ लाख ६५ हजार घन मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला असून जमिनीची उपयुक्तताही वाढविली आहे. कळंब्यातल्या पाण्यासाठय़ाची उंची सोमवारी १४.५ फुटांपर्यंत वाढल्याचे सुखद चित्र पाहायला मिळाले.

कोल्हापूरचा कळंबा ..१३० वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच कोरडा पडला. कधी पाणी टंचाई माहीत नसलेल्या कोल्हापूरने कोरडय़ा झालेल्या कळंब्याच्या रूपात पहिल्यांदाच टंचाई अनुभवली. पण या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतरही झाले. राज्य शासनाच्या वतीने प्रयत्नपूर्वक राबण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्यांदाच कळंबा गाळमुक्त झाला आणि दोनच दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने ५० टक्के भरलाही. कोल्हापूरचे भूषण असलेला कळंबा उन्हाळ्यात कोरडा पडला. टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने  सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानात समावेश केल्याने त्याचा   फायदा कळंब्यालाही झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कळंबा तलावातील गाळ काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी ६३ हेक्टर्स जलव्याप्त क्षेत्र असणाऱ्या तलावातील गाळ काढण्याला प्राधान्य दिले. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने १ लाख ६० हजार घन मीटर गाळ काढला आणि तितकाच म्हणजे १ लाख ६५ हजार घन मीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. या काढलेल्या गाळाचे वहन मात्र पूर्णत: लोकसहभागातूनच करण्यात आले.

प्रशासन आणि लोकसहभाग या दोहोंच्या संयुक्त प्रयत्नातून हाच गाळमुक्त झालेला कळंबा तलाव शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कोरडा ठणठणीत होता. पण शनिवारी दुपारी वरुणराजाने बरसायला सुरुवात केली आणि मुसळधार जलधारांनी सोमवारी १४.५ फुटापर्यंत कळंब्यातल्या पाण्यासाठ्याची उंची वाढवली. एकूण साठवण क्षमतेचा विचार करता कळंब्यातील हा पाणीसाठा ५० टक्के आहे. कळंबा तलावातला गाळ गावकऱ्यांनी काढून शेतात टाकला. तलावातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याबरोबरच गाळाने जमिनीची सुपीकताही वाढवली. कळंबा तलावातला गाळच नाही काढला, तर पाणीसाठाही वाढविला आणि जमिनीची उपयुक्तताही वाढवीली. पावसाचा जोर असाच राहीला तर लवकरच कळंबा आपला २७ फुटांर्पयचा टप्पा ओलांडून ओसंडून वाहत राहील, असे दिसत आहे. यातूनच जलयुक्तचे यश दिमाखाने  मिरवले जाईल.