संभाजीराजेंवर खोचक टिपणी
कोल्हापूर : आंदोलनामध्ये चालढकल चालत नाही हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लक्षात ठेवले पाहिजे. असा काही प्रकार होत असेल तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे, अशी खोचक टिपणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे.पुणे ते मुंबई लाँग मार्च काढला जाणार आहे, असे काल संभाजीराजे यांनी जाहीर केले होते. याबाबत आमदार पाटील यांनी संभाजीराजेंची भूमिका बदलत असल्याकडे निर्देश केले.ते म्हणाले,की आधी ते रायगडावरून मोर्चा काढणार असे म्हणाले होते.त्यास भाजपने मान्यता दिली होती. आता ते लोकप्रतिनिधींना जाब विचारणार असल्याचे म्हणत आहेत.नंतर ते लाँगमार्च काढणार आहेत. तुमची नेमकी काय भूमिका आहे हे समाजासमोर स्पष्ट केले पाहिजे. सरकारला वाचवण्यासाठी मदत करत आहात का, अशी विचारणाही त्यांनी केली.
करोना प्रश्नी राज्य शासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. देशात तीन लाख करोनाग्रस्त मृत्यू पावले आहेत. त्यातील एक लाख महाराष्ट्रातील आहेत. ३० टक्के करोनाग्रस्त एका राज्यात मृत पावणे हे गंभीर आहे. त्यात अकरा हजार मृत्यू लपवले गेले असल्याने हा आकडा आणखी मोठा होऊ शकतो.आपण कोठे कमी पडलो याचा राज्य सरकारने अभ्यास केला पाहिजे. यावर राज्याच्या अधिवेशनात आवाज उठवला जाईल. परंतु करोनाचे कारण देऊन अधिवेशन दोन दिवसात गुंडाळले जाईल, असेही ते म्हणाले.