नियमभंग केल्यास लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर कारवाई

कोल्हापूर : करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी या वर्षी राज्यातील महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत.

शुक्रवारी (१ मे) सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे परिपत्रकामध्ये नमूद आहे.

आमदार, अधिकारी विरोधात तक्रार

टाळेबंदी लागू असताना चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी कायद्याचा भंग करून शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले असल्याची तक्रार चंदगड पोलिसांमध्ये संतोष माळविकार यांनी दाखल केली आहे. आमदार पाटील चंदगड तालुक्यातील असले तरी त्यांचे वास्तव्य बेळगावमध्ये असते. बेळगावात करोनाचे ४३ रुग्ण आहे असून हे शहर रेड झोन मध्ये आहे. तेथे बाहेरून येण्यास व बाहेर जाण्यास मज्जाव आहे. तरीही पाटील यांनी बेळगावातून चंदगडमध्ये येऊन शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. त्या वेळी सुमारे तीस लोक तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. पाटील यांनी भोजन थाळीचा आस्वाद घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक हनुमंत धुमाळ हेही टाळेबंदीत अडचणीत आले आहेत. करोना विषाणू साथीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यात राहण्याचे तसेच मुख्यालय सोडू नये असे शासनाचे निर्देश असताना धुमाळ यांनी त्याचा भंग केल्याची तक्रार आहे. जिल्हाबंदीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून ते सातारा जिल्ह्यात शासकीय वाहनाचा वापर करून जाऊन राहिले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अन्यत्र ध्वजारोहण रद्द

सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा  कार्यक्रम आयोजित करू नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी (जिल्हाधिकारी कार्यालय) होणाऱ्या कार्यक्रमास इतर अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये, असेही गलांडे यांनी कळविले आहे.