तावडेची जिवाला धोका असल्याची तक्रार

ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याने कोठडीत जिवाला धोका असल्याच्या तक्रारीची दखल घेत, पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतील इतर आरोपींना अन्यत्र हलविले. दरम्यान, तावडे याचा तपास चार पथकांकडून सुरूच असून, त्याच्या माहितीत विसंगत माहिती मिळत असल्याने त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींकडून माहितीची पडताळणी केली जात आहे. यासाठी सनातनच्या पनवेल येथील आश्रमातील एक डॉक्टर आणि एका ड्रायव्हरचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.

एसआयटीकडून संशयित वीरेंद्र तावडे याची सध्या कसून चौकशी सुरू आहे. पोलीस मुख्यालय, पोलीस क्लब तसेच अन्य गोपनीय ठिकाणी चौकशी केल्यानंतर तावडेला रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जाते. पानसरे यांचा खून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अन्य आरोपीही असल्याने आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार तावडेने वकिलांकरवी पोलिसांकडे केली होती.

या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीतील अन्य पाच आरोपींना करवीर पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलविले. सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत तावडेला एकटय़ालाच ठेवले आहे. याशिवाय तावडेवर नजर ठेवणारा बंदोबस्तही वाढवला आहे. पोलीस कोठडीत डास खूप असल्याने आणि पुरेसे अंथरूण, पांघरूण नसल्याने झोप लागत नसल्याची तक्रार तावडेच्या वकिलांनी न्यायालयात केली होती.

आश्रमातील औषधे अन्न व औषध प्रशासनाकडे

पनवेल येथील सनातनच्या आश्रमात मिळालेली संशयास्पद औषधे तपासणीसाठी मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत. या औषधांमधील घटक, त्यांचे प्रमाण, औषधांचा परिणाम यांची माहिती मागवण्यात येणार आहे. औषधांच्या माहितीसाठी एसआयटीने स्वतंत्र प्रश्नावली तयार केली असून, ही प्रश्नावली अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे.