देशभरात तीन आठवडय़ांची संचारबंदी जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी झुंबड उडत आहेत. याची दखल घेऊन कोल्हापुरात आगामी २१ दिवसांचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून कुठलाही पुरवठा कमी पडणार नाही, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आश्वस्त केले आहे, तर कोल्हापूर आपत्ती निवारण व्यवस्थापनाचा आराखडा बनवला असून त्याद्वारे जनसुविधा उपलब्ध केली असल्याचा निर्वाळा महापौर निलोफर आजरेकर यांनी गुरुवारी दिला .

करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांनी एकत्र येण्याचे टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशभर संचारबंदी लागू केली आहे. अशा स्थितीत लोकांनी संयमाने वागून प्रतिसाद देणे अपेक्षित असून बहुतेक लोकांनी त्याला घरी राहून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही अतिउत्साही लोक गरजेपेक्षा अधिक प्रमाणात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावताना दिसत आहे. यामुळे किराणा दुकान, भाजी मंडई येथे अकारण गर्दी करीत आहेत. ही गर्दी टाळून त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न कोल्हापुरात जिल्हा, प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवला आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आगामी २१ दिवसांचे  नियोजन केले आहे. कुठलाही पुरवठा कमी पडणार नाही, अशी खात्री व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘व्हाट्स अ‍ॅप’ संदेशाची ताबडतोब दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

 दोन हेल्पलाईन

महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज महापौर कार्यालयातून सर्व २५ खातेप्रमुखांशी संपर्क साधून ऑनलाईन आढावा घेतला. महापालिकेच्या वतीने भाजी बाजार व किराणा मालाचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दोन हेल्पलाईन व्हॅट्सअ‍ॅप नंबरवर करोनाबाबत तक्रारी,अडचणी,सूचना असल्यास त्या द्याव्यात असे आवाहन केले आहे.

गॅस सिलिंडर घरपोच

ग्राहकांना एलपीजी गॅस रिफीलकरिता घराबाहेर पडण्याची गरज नाही. ७५८८८८८८२४ या क्रमांकावर एसएमएस किंवा व्हाट्सअ‍ॅप करू शकता. इंडियन ऑइल अ‍ॅपवरून बुक करू शकता. सध्या एलपीजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी इंडियन ऑइल आपल्या प्रमुख रिफायनरीजमध्ये एलपीजीचे उत्पादन वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. एलपीजी जास्ती प्रमाणात उत्पादन करणे,  वितरण सुव्यवस्थित केले जात आहे, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

Story img Loader