कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचसाठी १०० कोटीचा निधी दसऱ्यापूर्वी येईल, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई तिर्थक्षेत्र आराखड्यामध्ये आवश्यक काही बदल करण्यासाठी बैठक झाली. मंदिर परिसरातील विकास आराखडा अंतर्गत व्हिनस चित्रपटगृहजवळ बहूमजली वाहनतळ व भक्त निवास बांधणे कामासाठी प्रशासकीय मान्यता ४२.१६ कोटीचा निधी मंजूर आहे. तथापि सदर जागेत जलसंपदा विभागाने दिलेल्या नकाशानूसार ती जागा निळ्या पुररेषेत आहे.
त्या ऐवजी सदर ठिकाणी फक्त बहूमजली वाहनतळ इमारत बांधणे शक्य असल्याने त्यासाठी २६.३७ कोटीचा निधी आवश्यक असल्याचे आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. त्यामुळे व्हिनस चित्रपटगृहाजवळील भक्त निवास पुररेषेमुळे रद्द करून ते आता सरस्वती चित्रपटगृहाजवळ बहूमजली वाहनतळ इमारत होणार आहे. नवीन बदलाबात सादरीकरणात माहिती दिली. यासाठी अजून निधी प्राप्त झालेला नाही. डिएसआर बदलल्यामुळे ७९.९६कोटी रूपयांचा आराखडा आता १०० कोटींच्यावर जाईल. यावर बैठकीत चर्चा झाली.
हेही वाचा >>>आम्हाला रक्ताचे नव्हे तर दूधगंगेच्या पाण्याचे पाट वाहायचे आहेत; आमदार प्रकाश आवाडे यांचा हसन मुश्रीफ यांना टोला
याबाबत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या आठवड्यात मी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवरात्र उत्सवामध्ये हे पैसे प्राप्त व्हावेत अशी मागणी केली होती. या विजयादशमी पर्यंत निधी प्राप्त करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत.
या बैठकीला आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महानगरपालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, अतिरीक्त आयुक्त रवीकांत आडसूळ यांच्यासह इतर विकास आराखडा समिती सदस्य उपस्थित होते.