कोल्हापूर: गडहिंग्लज येथील गोडसाखर नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये पुन्हा एकदा कडवटपणा निर्माण झाला आहे. प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्या कारभाराला कंटाळून १२ संचालकांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. यामुळे कारखान्याचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे आहे.
अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्यात आज राजीनामा नाट्य रंगले. अध्यक्ष शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी कोणत्याही तयारीशिवाय कारखाना सुरू केला आहे असा गंभीर आरोप राजीनामा दिलेल्या 12 संचालकांनी पत्रकामध्ये केला आहे.
पत्रकात म्हटले आहे, कारखान्याच्या अध्यक्षांनी संचालकांना विश्वासात घेऊन कारखाना वेळाने सुरु करण्यातील फायदे तोटे विचारात घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते. तसेच कारखान्याचा कारभार सर्व संचालक मंडळास विश्वासात न घेता एकतंत्री कारभारामुळे सर्व सभासद व कारखान्याचा फार मोठा आर्थिक तोटा होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष हे नेहमीच बेजबाबदार व मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. शनिवारी परस्पर साखर विक्रीसाठी निर्णय घेतला असून ती थांबविण्याबाबत कारखान्यास आदेश देण्याची मागणीही साखर सहसंचालक यांच्याकडे कारखान्याच्या संचालक यांनी केली आहे .
डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतिश पाटील, विद्याधर गुरबे, दिपक जाधव, प्रकाश पताडे, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांचा राजीनामा दिलेल्यामध्ये समावेश आहे.
साखर विभागाचे आदेश लागु
प्रादेशिक साखर सहसंचालक एस एन जाधव यांनी याची तात्काळ दखल घेत कारखान्याला अधिकृत सभेच्या मंजुरीशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे.