कोल्हापूर : कोल्हापूर विभागाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७. १२ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालात ३.८८ टक्के इतकी घट झाली आहे. यावेळीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी येथे घोषित केला. हा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर झाला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही विभाग मिळून कोल्हापूर विभाग आहे. या विभागामध्ये सातारा, सांगलीपेक्षा कोल्हापूर जिल्हा निकालांमध्ये प्रथम स्थानी राहिला. सातारा ८६. २६ टक्के , सांगली ८६. ५५ टक्के तर कोल्हापूर विभागाचा ८८.२५ टक्के निकाल लागलेला आहे. एकूण १ लाख २५ हजार ४३३ विद्यर्थ्यांपैकी १ लाख ९ हजार २७९ विद्यार्थी यावर्षी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी म्हणजे मार्च २०१८ मध्ये ९१ टक्के निकाल लागला होता. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत निकालात ३.८८ टक्के इतकी घट झाली आहे.
तसेच मुले आणि मुली यांची तुलनात्मक स्थिती बघता मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १३. ७५ टक्क्यांनी अधिक असल्याचेही आढळून येते. शास्त्र शाखेच्या प्रश्नपत्रिकेचे बदललेले स्वरूप तसेच कृतिपत्रिका यांचा वापर यामुळे मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे निकालाचे प्रमाण घटले असल्याची शक्यता विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी व्यक्त केली. शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखा ९२ टक्के, कला शाखा ७६ टक्के , वाणिज्य शाखा ८८ टक्के व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम ७८ टक्के अशी टक्केवारी आहे.
देशिंगे यांची दुर्दम्य आशा
बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत असताना ७२ वर्षीय रवींद्रबापू देशिंगे सर्वाच्या कौतुकाचा विषय बनले. त्यांनी याही वयात बारावीची परीक्षा दिली आणि त्यात ते तीन विषय उत्तीर्ण देखील झाले. कला शाखेतून त्यांनी ही परीक्षा दिली होती. तीन विषयांमध्ये उत्तीर्ण होऊन दाखवत त्यांनी शिकण्यासाठी कोणत्याही वयाचे बंधन नसते; फक्त तीव्र इच्छा असावी लागते, हे दाखवून दिले आहे. दहावी झाल्यानंतर काही कारणाने त्यांना पुढचे शिक्षण करता आले नाही. काही कारणाने त्यांना ते मध्येच थांबवावे लागले. परंतु आपल्या नातीच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा बारावीची परीक्षा देण्याचे ठरवले. २०१७ मध्ये त्यांनी अकरावीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर. त्यांनी बारावीची परीक्षा दिली. वयाच्या साठाव्या वर्षांनंतर कोणती गोष्ट फारशी लक्षात राहत नाही असे म्हणतात. परंतु त्यांनी रोज नियमितपणे एक तास अभ्यास करून वयाच्या ७२ व्या वर्षी बारावी परीक्षा दिली हे वेगळेपण आहे.