कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये वाळूची बेकायदा चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक पोलिसांनी जप्त केले. पुढील कारवाईसाठी हे ट्रक करवीर प्रांत कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या कारवाईने वाळू तस्करांना दणका बसला आहे.

राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या गस्त घालत होत्या. त्यांना या हॉस्पिटलच्या जवळ वाळूचे ट्रक उभे असल्याचे दिसले. त्यांनी चौकशी केली असता या ट्रक चालकांकडे वाळूचे स्वामित्वधन भरल्याच्या पावत्या मिळाल्या नाहीत. बेकायदेशीर रीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी १४ ट्रक जप्त केले.

पुढील कारवाईसाठी हे ट्रक करवीर प्रांत कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे कट्टे यांनी रविवारी सांगितले. यामुळे वाळू तस्करीचा विषय पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

रस्त्यावर थुंकणाऱ्यावर गुन्हा 

कोल्हापूर शहरातील एका  व्यक्तीवर रस्त्यावर थुंकल्याने रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर एक दुचाकीस्वार तोंडाला मास्क न लावता मावा खाऊन रस्त्यावर थुंकत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यां दीपा सुरेश शिपूरकर यांनी पाहिले. त्यांनी त्या व्यक्तीस ‘रस्त्यावर थुंकू नका, तोंडाला मास्क लावा, इतरांच्या जीवितास, आरोग्यास धोका होऊ शकतो,’ असे समजावून सांगत होत्या. तरीही दुचाकीस्वाराने उद्धट प्रत्युत्तर दिले. शिपूरकर यांनी दुचाकीचे छायाचित्र घेऊन पोलिसांशी संपर्क साधल्यावर दुचाकीस्वाराचा शोध घेऊन ताब्यात घेतला. विक्रम विद्याधर नांदगावकर (वय ३९, रा. सानेगुरुजी वसाहत परिसर, मूळगाव रत्नागिरी) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे आढळले. संचारबंदीचे उल्लंघन करून करोना संसर्गजन्य आजार जनतेत पसरवून सार्वजनिक उपद्रव करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर कृती केल्याने या व्यक्तीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader