महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ातून सुमारे २०० उमेदवार गळाले असल्याचे गुरुवारी दिसून आले. शुक्रवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने आणखी किती उमेदवार मदानातून बाहेर पडतात हे स्पष्ट होणार आहे.
यंदा महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात विक्रमी संख्येने उमेदवार उतरले होते. एकूण ८७२ उमेदवारांचे १५२८ नामनिर्देशनपत्रे निवडणूक विभागाकडे सादर झाली होती. आखाडय़ाचा एकूण रागरंग पाहता आता अनेकांनी शड्डू मारण्याचे थांबवले आहे. गुरुवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी उपलब्ध माहितीनुसार पावणेदोनशे उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. यात बहुतांशी अपक्ष, डमी उमेदवारांचा समावेश होता. प्रमुख उमेदवारांपकी कोणीही माघार घेतल्याचे दिसले नाही. गुरुवारी उमेदवारी छाननी प्रक्रियेत १९ उमेदवार मदानात येण्यापूर्वीच अर्ज अवैध ठरल्याने गारद झाले होते. कालची व आजची संख्या पाहता राजकीय कुरुक्षेत्राला सुरुवात होण्यापूर्वीच सुमारे २०० जण रणांगणातून बाहेर पडले आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी हा आकडा कितीपर्यंत पोहोचतो याकडे लक्ष वेधले आहे.

Story img Loader