कोल्हापूर : जलसंपन्न कोल्हापूर जिल्हय़ाला दुष्काळझळा जाणवू लागल्या असून, जिल्ह्यतील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.
याची दखल घेऊन प्रशासनही दक्ष झाले असून, आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी सांगितले.
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिमीपेक्षा कमी झाले आहे, अशा कोल्हापूर जिल्ह्यतील १९ महसुली मंडळामधील २०१ गावांमध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यास शासन मान्यता दिली आहे.
या गावांमध्ये जमीन महसुलात सवलत, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.३ टक्के सवलत, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे अशा सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळय़ात तीव्रता
दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यतील २०१ गावांमध्ये सर्वाधिक गावे हातकणंगले तालुक्यात ६२ इतकी आहेत. त्या पाठोपाठ पन्हाळा आणि गडहिंग्लज तालुक्यातील ३५ गावे आहेत. करवीर तालुक्यातील ३४, शिरोळ तालुक्यातील १६ आणि भुदरगड तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे.