जलयुक्त शिवार अभियानातून राज्यातील गावागावात पाण्याचे शाश्वत जलसाठे निर्माण करुन पाणी टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे यंदाच्या जलयुक्त शिवार अभियानातून सिध्द होत आहे. शासन योजना आणि लोकसहभागातून राज्यातील ६५०० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानावर १८०० कोटी रुपये खर्च करुन केलेल्या कामामध्ये २४ टी.एम.सी पाणीसाठा झाला, ही जलयुक्त शिवार अभियानातून घडलेली क्रांती असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केले.जलयुक्त शिवार अभियानातून गाळमुक्त झालेल्या ऐतिहासिक कळंबा तलावातील पाण्याचे पूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी कळंबा गावातील मान्यवर उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभागातून १८८१ मध्ये बांधलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावातील गाळ काढण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आणि केवळ दोन अडीच महिन्यात सव्वातीन लाख घन मीटर गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध करुन देण्यात आला. यामुळे कळंबा तलावात यंदा ३२ कोटी ५० लाख लिटर वाढीव पाणीसाठा निर्माण होऊ शकला. यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरला असल्याचे गौरवोद्गारही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. कळंबा तलाव गाळमुक्त करण्यासाठी शासनाने ३७ लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला. मात्र लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने २ कोटी ६५ लाखाची काम लोकसहभागातून होऊ शकले. त्यामुळेच ३२ कोटी ५० लाख लिटर वाढीव पाणीसाठा होऊ शकला. याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि गावकरी, शेतकरी यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार अमल महाडिक म्हणाले, यापुढील काळातही पाण्याचा काळजीपूर्वक वापर करुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रत्येकानेच योगदान देणे गरजेचे आहे. कळंबा तलाव गाळमुक्त करण्यासाठी शासनाने विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सहकार्य उल्लेखनीय आहे.