कोल्हापूर : इचलकरंजी येथे क्रिप्टो करन्सीमधून चांगला परतावा आणि गुंतवणूकीच्या दुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत सातजणांची ३७ लाख ३० हजार ९०५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात व्यंकटेश दशरथ भोई (वय ३१ रा. राहुल अर्कस सोसा.बानेर पुणे), चेतन किरण मोहिरे (वय ३५ रा. इंदिरा हौसिंग सोसा.कबनूर), अजय मधुकर गायकवाड (वय ४६ रा. उद्यमनगर कोल्हापूर) आणि निखिल रमेश रेपाळ (वय ३५ रा.म.फुले हौसिंग सोसा.शहापूर) या चौघांना अटक केली करण्यात आली आहे. चौघांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या फसवणूक प्रकरणात प्रिती व्यंकटेश भोई (वय २९ रा. राहुल अर्कस सोसा.बानेर पुणे), प्रणाली चेतन मोहिरे (वय ३२ रा. इंदिरा हौसिंग सोसा.कबनूर), प्रगती विकास सोळांकुरे (रा. सांगली), इरफान माईद्दीन सय्यद (रा. मिरज) या चारजणांचा समावेश आहे. याप्रकरणी पंढरीनाथ तुकाराम महाजन (वय ४२, रा. रेंदाळ, ता. हातकणंगले) यांनी तक्रार दिली आहे.
आणखी वाचा-पाण्याचा तिढा वाढला; इचलकरंजी नंतर कुरुंदवाडलाही दुधगंगेतून पाणी देण्याची मागणी
फिर्यादी पंढरीनाथ महाजन व संशयित व्यंकटेश भोई यांची एकमेकांशी ओळख आहे. त्यातून अडीच वर्षांपूर्वी व्यंकटेश भोई यांनी एका सेमिनारमध्ये प्रिती भोई, चेतन मोहिरे, प्रणाली मोहिरे, प्रगती सोळांकुरे, अजय गायकवाड, इरफान सय्यद व निखिल रेपाळ यांच्याशी ओळख करुन दिली.. त्यांना राजीव गांधी हॉलसमोर असलेल्या कापड मार्केटमधील एका कार्यालयात बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून महाजन यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला परतावा देतो, गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम मिळवून देतो असे सांगितले. त्याचबरोबर एका क्वाईनची किंमत लिस्टींगनंतर एक लाख रुपये होऊन भारतीय रुपयांच्या तुलनेत अनेक पटीने परवाना मिळवून देतो असे आमिष दाखवले.
आणखी वाचा-कोल्हापुरातील कुख्यात केदार टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता
त्या आमिषाला बळी पडून महाजन यांनी २४ लाख ७० हजार ९०५ रुपये भरले. तसेच ओळखीच्या सहा मित्रांना १२ लाख ६० हजार रुपये भरायला लावले. सर्वांनी मिळून फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत वेळोवेळी चेक, गुगल पे व रोख स्वरुपात ३७ लाख ३० हजार ९०५ रुपये इतकी रक्कम गुंतवली. परंतु दिलेल्या आश्वासनानुसार काहीच मोबदला मिळाला नाही. या संदर्भात महाजन यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी गावभाग पोलिस ठाण्यात धाव घेत उपरोक्त आठ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी व्यंकटेश भोई, चेतन मोहिरे, अजय गायकवाड व निखिल रेपाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाची आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय व्याप्ती असण्याची शक्यता वर्तविली असून ज्यांची फसवणूक झालेली आहे. त्या संबंधितांनी कागदपत्रांसह गावभाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पो.नि. खानापुरे यांनी केले आहे. यामध्ये शहर व परिसरातील अनेक दिग्गजांचा समावेश असल्याची चर्चा आहे.