शिरोळ तालुक्यातील उदगांव येथे झायलोची दुधाच्या टँकरशी जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात चौघे जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. शीतल बाजीराव पाटील, प्रतीक प्रकाश मोहिते, अनंत कुमार खोत आणि कपिल विजय पाटील अशी मृतांची नावे असून, संतोष गणू देवू, सचिन जमखंडीकर हे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झालेला हा अपघात झायलो गाडीचा टायर फुटल्यामुळे झाला आहे.
याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मिरज तालुक्यातील नांद्रे येथील शीतल पाटील, प्रतीक मोहिते, अनंत खोत, कपिल पाटील आणि मुंबई येथील संतोष देवू व सचिन जमखंडीकर असे सहा जण झायलो (क्र. एमएच ०५ केएस ८७४४) मधून कोल्हापूरहून मध्यरात्री सांगली जिल्ह्यातील आपल्या गावी निघाले होते. जयसिंगपूरपासून नजीकच असलेल्या उदगांव गावाजवळ झायलोची सांगलीहून येणाऱ्या दुधाच्या टँकरला (क्र. एमएच १० डीडी १०१०) जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की झायलो गाडी टँकरखाली घुसल्याने झायलोचा चक्काचूर झाला होता. तर शीतल पाटील, प्रतीक मोहिते, अनंत खोत, कपिल पाटील हे चौघे जागीच ठार झाले. तर देवू आणि जमखंडीकर हे पाठीमागील बाजूस बसले असल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जयसिंगपूर येथील पायस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यावर काचा आणि रक्ताचा सडा पडला होता. दोन्ही वाहनांच्या धडकेच्या आवाजाने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. ही धडक इतकी भीषण होती, की चौघांचे मृतदेह गाडीतून काढण्यासाठी गाडीचा पत्रा कापावा लागला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रखडलेली वाहतूक सुरळीतपणे सुरू केली. या अपघाताची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा