लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री. महालक्ष्मी देवी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ४० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली. करवीर निवासिनी श्री. महालक्ष्मी देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधी मिळणे हा पालकमंत्री म्हणून माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे, असेही ते म्हणाले.
मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे कि,विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे २००९ साली उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री असताना या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ५० कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी १० कोटीच रुपये अर्थसंकल्पित झाले होते. ४० कोटी रुपये द्यावेत, अशी आग्रही मागणीसाठी मी पालकमंत्री झाल्यानंतर सतत लकडा लावला होता. त्यानंतर या मागणीचा पुरवणी मागण्यांमध्ये समावेश झाल्यानंतर हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केल्याबद्दल पालकमंत्री म्हणून या तिघांचेही आभार मानतो.
आणखी वाचा-सिंचनवृद्धीमध्ये सांगली मंडळ राज्यात अव्वल
पालक मंत्री झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचे तीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन, असे जाहीर आश्वासन जनतेला दिले होते. त्यापैकी; काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनळने पाणीआणणे हा प्रकल्प मार्गी लागला. लवकरच लोकार्पण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूरचे सुपुत्र माजी मंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली होती. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल होते. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथे ३० एकर राखीव जागाही होती. ते सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची त्यांची इच्छा होती. परंतु; मूर्त स्वरूप आले नव्हते. या ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचा भूमिपूजन शुभारंभ होणार आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.