लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५९६ कोटी जमा व ६०१ रुपये खर्चाचा अंदाजपत्रक बुधवारी अधिसभेत मंजूर करण्यात आले. ५ कोटी ४२ लाख रुपये इतकी तूट असून ती विद्यापीठ निधीतील शिलकेतून भरून काढली जाणार आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्यास हा अर्थसंकल्प अक्षम असल्याची टीका यावेळी करण्यात आली.
अंदाजपत्रकाचा मसुदा तयार करण्यासाठी १) डॉ. एस.एस. महाजन, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा २) डॉ. एस.बी. महाडीक, अधिविभागप्रमुख, संख्याशास्त्र अधिविभाग ३) डॉ. एम. व्ही. वाळवेकर, प्राणिशास्त्र अधिविभाग ४) डॉ. प्रतिमा पवार, अधिविभागप्रमुख, समाजशास्त्र अधिविभाग यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांचा हा मसुदा आज कुलगुरू डॉ. डी. बी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत सादर करण्यात आला.
आणखी वाचा-अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एक डॉक्टर अटकेत; एकूण सातजण जेरबंद
अशी आहे जमा
सन २०२४-२५ या वर्षात प्रशासकीय विभागांकडून रु. ४०.८९ कोटी, शास्त्र अधिविभागांकडून रु. ५.०७ कोटी, इतर अधिविभागांकडून रु.२.७८ कोटी जमा होण्याची अपेक्षा असून इतर उपक्रमांमधून रु.३३.५१कोटी असे एकूण रु.८२.२६ कोटी विद्यापीठाच्या स्वनिधीत जमा अपेक्षित आहे. वेतन अनुदानापोटी शासनाकडून रु.१४२.३० कोटी, तर वेगवेगळ्या संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी रु. १०.८४ कोटी जमा अपेक्षित आहे, विद्यापीठाच्या संशोधन व विकास निधीतून रु. ४५.२४ कोटी इतकी रक्कम व घसारा निधीच्या शिल्लक रक्कमेतून रु. १३.६१ कोटी इतकी रक्कम जमेकरिता प्रस्तावित केलेली आहे. निलंबन लेख्यांमधून रु. ३०२.०४ कोटी असे एकूण रु. ५९६.२९ कोटी जमा होणे अपेक्षित आहे.
असा होणार खर्च
तसेच खर्चाकरिता खालीलप्रमाणे प्रस्तावित केले आहे. प्रशासकीय विभाग रु. ५५.०२ कोटी, शास्त्र अधिविभाग रु. ६.१९ कोटी, इतर अधिविभाग रु. ६.३१ कोटी, विविध सेवा व इतर उपक्रम रु. ४९.१२ कोटी असा विद्यापीठाच्या स्वनिधीमधील रु.११६.६५ कोटी खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च रु.१५७.८२ कोटी, तर विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीमधून खर्चासाठी रु. ४.३९ कोटी तसेच संशोधन व विकास निधी रु. ४५.२४ कोटी व घसारा निधी – रु. १३.६१ कोटी, निलंबन लेखे रु. २६४ कोटी अशी एकूण रु. ६०१.७२ कोटी खर्चासाठी तरतूद प्रस्तावित आहे.
विकासाची ठळक वैशिष्ट्ये
शैक्षणिक व संशोधनकार्यासाठी ग्रंथालय विभागास २.६० कोटी, विद्यार्थ्यांनी वसतिगृह २.७५ कोटी, विद्यार्थी वसतिगृह २.२७ कोटी, उपकरणे खरेदी तीन कोटी, संशोधनाला चालना सव्वा दोन कोटी, क्रीडा विभाग वसतिगृह तीन कोटी, सौर यंत्रणा साडेतीन कोटी.
आणखी वाचा-कोल्हापूर : परराज्यातील सराईत चोरट्याकडून घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
संशोधन विकास निधीला कात्री
अंदाजपत्रक अत्यंत निराशाजनक असून त्यात भविष्यातील आव्हाने विचारात न घेता कॉपीपेस्ट केल्याची शंका येते. अकॅडेमिक बाबींसाठी अत्यंत तुटपुंजी तरतूद आहे. संशोधन विकास निधीतील सुमारे दीड कोटी रुपये रस्ते बांधकामासाठी तरतूद करणे ही धक्कादायक बाब आहे, अशी टीका अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी यांनी केली.
सामान्य प्रशासनाचा खर्च दीड कोटींनी वाढला गेला आहे. परीक्षा विभागाने यंत्रणा इन हाऊस करून सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. सायन्स साठी जमा वाढलेले असले तरी या विभागाच्या खर्चाला कात्री लावली आहे. खर्डेकर ग्रंथालयासाठी निधी वाढविला जावा. स्टुडंट फॅसिलिटी, मुले व मुलींची हॉस्टेलस, कमवा शिका हॉस्टेल, डिओटी यांच्यावरील खर्च वाढवला जावा. शासकीय यंत्रणांचा निधी कमी होत आहे त्यांचेशी चांगला फॉलोअप घेण्यात यावा. मेंटेनन्स वरील खर्च वाढवला जावा. विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयाच्या शिक्षकांना संशोधनासाठी पुरेसा निधी दिला जावा. इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी व संगणक प्रणाली साठी तरतूद केलेला निधी अत्यंत तुटपुंजा आहे. विद्यापीठाने सर्वसमावेशक व शिक्षणविकासाला भविष्यवेधी चालना देणारी सुधारणा अंदाजपत्रकात करणे आवश्यक आहे, असे ॲड. अभिषेक मिठारी, अधिसभा सदस्य यांनी म्हटले आहे.