कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर तळवडे (ता. शाहूवाडी) जवळ शनिवारी झालेल्या अपघात पुणे येथील पाच जण ठार झाले. चालकाचा ताबा सुटल्याने मोटार झाडावर आदळून हा अपघात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. विशाळगड येथे देव दर्शनासाठी गेलेल्या शेख कुटुंबातील आई, वडील, मुलगा, सून व लहान मुलगी यांच्यावर काळाचा घाला पडला. शरीफ करीम शेख (वय ६५), त्यांची पत्नी सलीमा (६०), मुलगा इम्रान (३८), त्याची पत्नी शीफा (३०), नात लिबा अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात शेख कुटुंबीय राहण्यास आहे. रमजान महिन्यातील रोजाचा उपवास सुरू होणार आहेत. तत्पूर्वी शाहुवाडी तालुक्यातील विशाळगड येथे असलेल्या मलिक रेहमान बाबांच्या दर्शनासाठी जाण्याचा भेट त्यांना आखला होता. त्यासाठी ते सकाळीच पुण्याहून बाहेर पडले. त्यांची मोटार इम्रान चालवत होता.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर तळवडे येथे एक अपघाती वळण आहे. येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोराने आदळली. धडक इतकी जोरदार होती की हेड लाइट, काही सुटे भाग ५० फुटांवर जाऊन पडले. गाडी पुढील भागापासून मागील सीटपर्यंत फाटत गेली.
गाडीत बसलेले शरीफ करीम शेख, सलीमा, इम्रान, शीफा हे चौघेही जागीच ठार झाले, गंभीर जखमी झालेली लिबा हिला उपचारासाठी कोल्हापूरला आणण्यात आले, पण उपचार करण्यापूर्वी ती मृत्यू पावल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
सलग दुसऱ्या दिवशी अपघात
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर गोगवे (ता. शाहूवाडी) येथे शुक्रवारी सकाळी मोटारीच्या चालकाचा ताबा सुटून गाडी झाडाला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात माळशिरस बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास नामदेव मगर व कु. इंद्रायणी अनिल जवळकर हे ठार झाले होते. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने वाहतूक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा