कोल्हापूर :जीबीएस (गुलियन बॅरे सिंड्रोम) या आजाराचा पहिला रुग्ण आज कोल्हापुरात दगावला. चंदगड तालुक्यातील एका ६० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या आजाराचा रुग्ण दगवल्याने त्याची चर्चा आहे. राज्यात सध्या जीबीएस आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. या आजाराची लागण झालेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्य शासनाने जीबीएस आजाराबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करतानाच याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचे म्हटले आहे. तथापि आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना आज पुढे आली आहे.
दुर्मिळ तितकाच महागडा आजार म्हणून ‘जीबीएस’ या आजाराकडे पाहिले जाते. राज्यात सध्या ‘जीबीएस’ आजाराची रुग्ण संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका ज्येष्ठ महिलेला जीबीएस आजाराची लागण झाली होती. तिच्यावर येथील सीपीआर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
सोनारवाडी तालुका चंदगड येथील ६० वर्षीय महिला तीन दिवसांपूर्वी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दाखल झालेली होती. काल दुपारी पावणेपाच वाजता मृत्यू पावल्या आहेत. निदान गलेन बारे सिंड्रोम याची खात्री केलेली होती. प्लाजमापेरीसिस उपचार चालू होता. परंतु, अत्यंत गतिमानपणे रोगाचा वाढ झाल्यामुळे उपचारस प्रतिसाद मिळाला नाही. तसेच वय हा सुद्धा एक घटक कारणीभूत होता. इतर सर्व रुग्ण सुस्थितीत असून सुधारत आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी शुक्रवारी सांगितले.