कोल्हापूर – नऊ वर्षाच्या सृष्टी प्रशांत मगदूम हिने सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स परत करून प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला. सांगली येथे पंचशील नगरात रहात असलेली नजमा दिलदार अत्तार या आपल्या नातेवाईकांसमवेत रविवारी दुपारी आंबा घाट येथे गेल्या होत्या. तेथे गेल्यावर एका दगडावर पर्स ठेऊन फोटो काढ़त असताना पर्स तेथेच विसरून मोटारी मध्ये बसून निघून गेल्या.
हेही वाचा >>> कोल्हापूर महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना दणका; रस्ते कामातील सावळा गोंधळ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस
त्यावेळी त्याच ठिकाणी कोल्हापुरातील मगदूम कुंटुबिय तेथे पोहचले. तेव्हा सृष्टी हिला ती पर्स सापडली. पर्सच्या मालकीणीचा शोध घेण्यासाठी तिच्या वडीलांनी मुंबई येथील आपला पोलिस मित्र राहुल पाटील यांना फोन केला.
त्यांनी करवीर पोलिस ठाण्यातील कॉ.योगेश कांबळे यांना या घटनेची माहिती दिली. कांबळे यांनी ही माहिती पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना दिली. त्यांनी ही माहिती जिल्हयातील पोलिस अधिकारी यांच्या ग्रुपमध्ये कळवली. त्याआधारे पर्स आत्तर यांची असल्याचे समजले. सात तोळे दागिन्यांसह २७ हजार रुपये असलेली पर्स परत केली. सृष्टी हिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.