कोल्हापूर : येथील सराफ व्यावसायिकांचे सुमारे पाऊण कोटी रुपये किंमतीचे दीड किलो सोने घेऊन बंगाली कारागीराने अन्य साथीदारांसह गुरुवारी पलायन केले. काशिनाथ बंगाली असे त्याचे नाव आहे. या घटनेने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.
काशिनाथ बंगाली हा सोने कारागीर गेली पंधरा वर्षे गुजरी परिसरातील महादेव गल्लीत राहत होता. कोल्हापुरातील अनेक सराफ पेढ्यांचे दागिने बनवण्याचे तो काम करत होता. त्याच्याकडे जवळपास आठ ते दहा कामगार काम करत होते. आज सकाळी आपल्या आठ ते दहा साथीदारांसह त्याने कोल्हापुरातून पोबारा केला.
हेही वाचा – शिंदे गटाचे कोल्हापूरमध्ये अधिवेशन, दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान
यांना बसला फटका
याची माहिती मिळताच त्याच्याकडे दागिने करण्यासाठी सोने दिलेल्या सराफांनी महादेव गल्ली परिसरात गर्दी केली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्वप्निल भुरके यांचे ९३ ग्रॅम, राघवेंद्र रेवणकर यांचे ६०० ग्रॅम, तर चिपडे सराफ यांचे २५० ग्रॅम सोने घेऊन काशिनाथ बंगाली या परप्रांतीय कारागिराने पोबारा केला. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या सराफ व्यवसायिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.