कोल्हापूर: नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमीहीन होण्याच्या धोका आहे. यामुळे हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम महामार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे काम शासकीय पातळीवर जलद गतीने सुरू आहे. राज्यातील हा सर्वात मोठा महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी, महालक्ष्मी, काड सिद्धेश्वर मठ , संत बाळूमामा मंदिर या मंदिरांना तो जोडला जाणार आहे.
महामार्ग बनविताना शेतजमिनी जाणार असल्याने शेतकरी भूमीन होणार आहेत. शेती हा उत्पन्नाचा मुख्य मार्ग जाणार असल्याने शेतकरी अडचणीत येणार आहेत. अलीकडे कालवे, नदी याचे पाणी मिळाल्याने या भागातील शेती फुलू लागली असताना ती रस्ते कामासाठी संपादित झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उद्भवणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात यावा, त्याऐवजी तो सोलापूर – मिरज महामार्गावरून कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात यावा, अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध असून त्याचा विचार वापर केला जावा आदी तेरा मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.मोर्चामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची मांडणी गिरीश फोंडे, एम. पी. पाटील, शिवाजी मगदूम, सुधीर पटोळे, योगेश कुळवमोडे, रूपाली मोरे, युवराज पाटील, शहाजी कपले, आनंदा पाटील आदींनी भाषणात केली.
हेही वाचा >>>साखर कारखानदारांना मतपेढीची चिंता; केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सहकारी बँकेच्या निर्णयाचा फटका
दिलासा देऊ – मुश्रीफ
दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मोर्चा स्थळी येऊन शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. याबाबत शासनाशी बोलून शेतकऱ्यांना दिलासा जाईल, असे आश्वासन दिले. त्यांची पाठ वळताच दिलासा नको तर प्रकल्प रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या.