कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीला महायुतीने एकसंघपणे सामोरे जाण्याची गरज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त बैठकीत व्यक्त केली. प्रत्यक्षात काल मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम स्वतंत्र आणि उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम वेगळे झाले. दुसरे उपमुख्यमंत्री आलेच नाहीत. एकाच शहरात असताना किमान एखाद्या कार्यक्रमाला तरी महायुतीचे नेते एकत्रित उपस्थित राहिले असते, तर युतीसाठी चांगला संदेश गेला असता अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची चिन्हे आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर भाजप, महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, राज्यात पुन्हा शासन येईल अशाही भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. निवडणूक तोंडावर असताना कोल्हापुरात विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याच्या नियोजन बैठकीवेळीच निवडणूक संदर्भातील काही कार्यक्रमांना घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याची नाराजी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर बोलून दाखवली होती. निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीमध्ये अशाप्रकारे समन्वयाचा अभाव असणे योग्य होणार नाही. महाविकास आघाडीप्रमाणे ऐक्य दिसण्याची गरज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. खेरीज, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमातून ऐक्याचा संदेश पेरला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. तथापि या अपेक्षा प्रत्यक्षात उतरल्या नसल्याचे एकंदरीत चित्र होते.
हेही वाचा – कोल्हापुरात आज विजयादशमीची धूम; शाही दसऱ्याचे आकर्षण
समर्थकांच्याच कार्यक्रमाला उपस्थिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला होता. कोल्हापूर जिल्हा बँक आणि शासकीय रुग्णालयाच्या कार्यक्रमाची सूत्रे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. कोल्हापूर शहरातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाची जबाबदारी राज्य कार्यकारी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे होती. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. अजितदादा यांची अनुपस्थिती होती. विकासकामांचे उद्घाटन आणि जिल्हा बँकेचा कार्यक्रम यात फारसे अंतरही नव्हते. किमान एखाद्या कार्यक्रमाला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली असती, तर ऐक्याचा संदेश गेला असता. मात्र, या निमित्ताने महायुतीतील नेत्यांमधील समन्वयाचा अभाव दिसला. आपल्या समर्थकांच्याच कार्यक्रमाला जाणे दोन्ही नेत्यांनी पसंत केल्याचे दिसून आले. एकीकडे कार्यकर्ते निवडणुकीला एकविचाराने सामोरे जाण्याच्या मन:स्थितीत असताना नेत्यांचे वर्तन याला छेद देणारे होते.
हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवारीवरून महायुतीतील वाद काटेरी वळणावर
महायुतीचे ऐक्य अबाधित
अर्थात या प्रकारची चर्चा महायुतीला मान्य नाही. भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले, की काल बरेच कार्यक्रम असल्याने काही गोष्टी घडल्या. महायुतीचे स्थानिक नेते दोन्हीकडच्या कार्यक्रमांना उपस्थित होते. निवडणुकीला एकत्रित जायचे असल्याचा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. विधानसभेला आम्ही संघटितपणे सामोरे जाणार आहोत.