कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकातील तरतुदी पाहता स्वनिधीतून कामे करणे तसेच भांडवली खर्च होऊ शकणार नाही, असे चित्र आहे. यामुळे हे अंदाजपत्रक म्हणजे ‘स्वप्नांचे इमले, कल्पनांचे मनोरे’ अशी बिकट अवस्था आहे, अशी टीका आम आदमी पक्षाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ आदी उपस्थित होते.
महापालिकेने यंदाचा १३३४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये ७०७ कोटी महसूली उद्धीष्ट आहे. मागचा अनुभव पाहता घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट तसेच परवाना यासारख्या महसूल गोळा करून देणाऱ्या विभागांना ८० टक्के देखील वसुली करता आलेली नाही. मागील अर्थसंकल्पमधील ५८८ कोटी महसूल गोळा होणे अपेक्षित असताना केवळ ४८१ कोटीच वसुली झाली. परिणामी विकासकामांवर मर्यादा येणार आहेत.
प्रदूषण रोखण्यात अपयशी
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत आज अखेर २४ कोटी रुपये केले तरी हवा प्रदूषणात कोल्हापूर अव्वल होत निघाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपाययोजना फोल ठरत आहेत, हे यावरून दिसून येते.
कर्जबाजारीच्या उंबरठ्यावर शंभर कोटी रस्ते विकास प्रकल्प व अमृत दोन योजनेमध्ये महापालिकेचा ३० टक्के हिस्साकरिता १४४ कोटी रुपये उभे करायचे आहेत. परंतु, आपले सर्व मार्केट आधीच गहाण ठेवलेल्या महापालिकेला कोठून कर्ज मिळणार हा प्रश्न आहे.