कोल्हापुरात एकाकडून नि:शुल्क सेवा

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

एखादी व्यक्ती प्रकाशझोतात आली की तिचे अनुकरण करण्याची पद्धत तरुणाईत असते. सध्या बहादूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे असेच चर्चेत आलेले भारदस्त व्यक्तिमत्त्व. पाकिस्तानमध्ये ६० तास घालवल्यानंतर ते मातृभूमीत आल्यावर ते तरुणाईच्या गळय़ातील ताईत बनले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आकर्षक भाग म्हणजे त्यांच्या झुपकेदार वक्राकार  मिश्या. स्वाभाविकच ‘अभिनंदन स्टाइल’ मिश्या कोरण्याची फॅशन करवीरनगरीत अल्पावधीत वाढली आहे. केशकर्तनालयात तरुणांच्या रांगा लागल्या आहेत. धनंजय भालेकर या तरुण सलून चालकाने तर ही नि:शुल्क ‘देशसेवा’ सु्रु केली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बहादूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या पराक्रमाच्या कथा माध्यमांतून लोकांसमोर पोहोचल्या आहेत. पाकिस्तानातून त्यांच्या सहीसलामत परतण्याच्या घटनेमुळे ते खरेखुरे नायक बनले आहेत. आधीच ‘युद्धस्य  कथा रम्य..’ त्यात अभिनंदन वर्धमान यांची कामगिरी अभिमान वाटावा अशी. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आपला ‘लुक’ दिसावा याची ‘क्रेझ’ तरुणाईत वाढत आहे. त्यांच्या मिशीवर अनेक जण फिदा झाले आहेत. कोल्हापुरात चित्रपट, नाटय़ याचे वातावरण असल्याने नव्या फॅशन-स्टाइलला लगेचच तरुणाईकडून साथ मिळते.   अभिनंदन यांच्याप्रमाणे मिशी कोरण्याची सुविधा काही केशकर्तनालयात सुरू झाली आहे. तरुणाई तिकडे ओढली गेली आहे.

मोफत सेवा!

कोल्हापुरातील राजारामपुरीमधील ‘हेअर अफेअर’ या सलूनने यात वेगळेपण जोपासले आहे. याचे चालक धनंजय भालेकर यांनी चक्क ‘मोफत अभिनंदन स्टाइल मिशी’, असा उपक्रमच सुरू केला आहे.  या बाबत धनंजय यांनी अभिनंदन वर्धमान यांचे शौर्य भावल्याने हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. हे काम कसे केले जाते याविषयी त्यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ते म्हणाले, की अभिनंदन यांची मिशी तलवार कटशी साधर्म्य साधणारी आहे. तरुणांमध्ये सध्या दाढी वाढवण्याची ‘क्रेझ’ आहे. पण आता त्यांना अभिनंदन यांच्याप्रमाणे मिश्या हव्या आहेत. हे काम जोखमीचे आहे. मिश्या कोरताना बारीकशी चूक झाली तरी सारा नूर बदलतो. पण मिश्या कोरून झाल्या की देशसेवा केल्याचा आनंद मिळतो. हे काम एखाद्याने व्यावसायिक करायचे ठरवले तर मिशा कोरण्यासाठी १०० रुपये आणि केस कापण्यासाठी १५० रुपये आकारले असते. मी ही सेवा नि:शुल्क करीत असलो तरी त्याचा आनंद आहे. दिवसभरात १५ हून अधिक तरुणांना अभिनंदन यांच्याप्रमाणे चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Story img Loader