कोल्हापूर : गतिमंद युवतीवर अत्याचार प्रकाराचे संतप्त पडसाद रविवारी मलकापूर शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भर पावसात महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मलकापूर (तालुका शाहूवाडी) येथे चार दिवसांपूर्वी २३ वर्षीय गतिमंद तरुणीवर गावातीलच अनिल गणपती भोपळे (वय व ५५ ) याने अत्याचार केल्याची आणि त्यातून ती गर्भवती असल्याचे दिसून आल्याने भोपळे याच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. घटनेच्या निषेधार्थ मलकापूर नगर परिषद व कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग या प्रमुख मार्गावर निषेध फेरी काढून संशयित आरोपीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
भावनांचा बांध कोसळला
भोपळे याच्यावर कठोर कारवाई करावी, त्याला अटक करून लोकांसमोर हजर करावे, त्याचे वकीलपत्र कोणी घेऊ नये अशा संतप्त प्रतिक्रिया आज महिला व तरुणींनी मोर्चा वेळी व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात संताप आणि अश्रू ओघळताना दिसत होते. संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र निषेध केला.
हेही वाचा – कोल्हापूर : संभाजी महाराज पुतळा उभारणीवरून इचलकरंजीत आमदार – माजी नगरसेवकात शाब्दिक चकमक
निष्पक्ष तपास
शहरवासीयांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना निवेदन दिले. सावंत्रे म्हणाले, तपासात हयगय केली जाणार नाही. वरिष्ठ महिला अधिकारी घटनेचा तपास करत आहेत. पीडितेला न्याय देण्यासाठी तपास निष्पक्षपातीपणे केला जाणार आहे. आरोपीला अटक करून कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही दबावाला पोलीस प्रशासन बळी पडणार नाही.