कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कामे विहित कालावधीत झालीच पाहिजेत असा दंडक करण्यात येईल. नागरिकांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत. कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे इचलकरंजी महापालिकेच्या नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले.
पदभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रशासनाच्या ढिलाईमुळे नागरिकांची कामे होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर त्या म्हणाल्या, यापुढे नागरिकांच्या तक्रारींची किमान वेळात निर्गत झाली पाहिजे यास माझे प्राधान्य राहील. काम दाखल झाल्यानंतर ते किती वेळात मार्गी लागले याची विचारणा अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली जाईल. कुचराई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ठरावीक वेळी मी नागरिकांशी संवाद साधणार आहे. नागरी हिताची कामे सत्वर मार्गी लागण्यास माझे महत्त्व राहील. कोणताही नागरिक माझ्याशी कोणत्याही वेळी मोबाइलवर संपर्क साधू शकेल.
तोवर बिले नाहीत
महापालिकेकडून केली जाणारी कामे निकृष्ट दर्जाची असतात, असा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पाटील म्हणाल्या, कामे गुणवत्तापूर्ण, बिनचूक झालीच पाहिजेत अशी भूमिका राहील. गुणवत्ता नियंत्रण तपासणी झाल्याशिवाय कोणत्याही कामाचे बिल अदा केले जाणार नाही. महापालिका स्थापन झाल्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणती कामे करावी याचीच निश्चिती झालेली नव्हती. लवकरच सर्व अधिकाऱ्यांचे कामाचे स्वरूप आणि काम किती वेळात पूर्ण करावे याची रूपरेषा निश्चित करून त्याप्रमाणे कृती केली जाईल.
या कामांना प्राधान्य इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा योजना सक्षम करणे त्याचबरोबर दूधगंगा योजनेचा पाठपुरावा करणे यास प्राधान्य राहणार आहे. कचरा उठाव, अतिक्रमण निर्मूलन, शाळा सुधारणा, पर्यावरण प्रश्न याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.