ग्रामीण जनतेने हद्दवाढ नको असल्याचे म्हणणारे मुद्दे निखालसरित्या खोडून काढत शनिवारी करवीर नगरीच्या प्रगतीसाठी हद्दवाढ ही झालीच पाहिजे अन्यथा तीव्र संघर्ष करायला लागला तरी हरकत नाही, असा इशारा हद्दवाढ कृती समितीने बठकीत दिला. शहरातील प्रत्येक सुविधांचा लाभ पाहिजे. मात्र हद्दवाढीला केवळ विरोध करायचा म्हणून करण्यात येत आहे. शिवाय शहरी आणि ग्रामीण अशी दरी निर्माण करून काही राजकीय मंडळी राजकारण करीत असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बठकीत करण्यात आला. हद्दवाढीच्या समर्थनात समितीच्या वतीने आणि विविध संघटनांच्या वतीन निवेदनही देण्यात आले.

हद्दवाढीबाबत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीसमोर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती सामितीने आपली बाजू मांडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात समिती सदस्यांनी हद्दवाढ कृती समितीची बाजू समजून घेतली. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महानगरपालिका स्थापनेपासून आजअखेर महापालिकेची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढीमुळे शहराचा विकास खुंटला आहे, तर शहरालगतच्या गावांचा अनियंत्रित विकास होत आहे. यामुळे भविष्यात अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, अशी भूमिका घेत हद्दवाढ कृती समितीने काही झाले, तरी हद्दवाढ झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा या वेळी घेतला. हद्दवाढीच्या समथनार्थ अनेकांनी बाजू मांडत हद्दवाढ गेली ४२ वर्षांपासून रखडली आहे. यामुळे हद्दवाढीबाबत आता निर्णय झाला नाही तर यापुढे मात्र हा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. यामुळे द्विसदस्यीय समितीने आताच योग निर्णय घ्यावा, अशी मागणीही अनेकांनी केली. हद्दवाढ झाली नाही तर त्याचे गंभीर परिणाम सोसावे लागणार आहेत. प्रसंगी त्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागला, तरी हरकत नाही असा इशाराही या वेळी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती सामितीच्या वतीने देण्यात आला.

माजी महापौर महादेव आडगुळे, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, दिलीप देसाई यांनी २५ किलो मीटर क्षेत्रातील सर्वच गावे हद्दवाढीत समाविष्ट झाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढ झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. खाऊन उपोषण करतात त्यांना उपाशीपोटी राहण्याची सवय नसल्याची टीका शुक्रवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली होती. यावर आमदार क्षीरसागर यांनी ज्यांची कारखाने आहेत त्यांनाच उपाशीपोटी राहण्याची सवय नसल्याचा टोला लगावला. वकील विवेक घाडगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, भरत रसाळ, चेम्बर ऑफ कॉमर्सचे आनंद माने, नगरसेवक भूपाल शेटे यांनी हद्दवाढीबाबत मुद्दे उपस्थित  केले.

दरम्यान, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी हद्दवाढ झाल्यास  आरक्षण टाकून जमिनी लाटल्या जातील, असा ग्रामीण जनतेचा गरसमज पसरविण्यात येत आहे. मात्र पडद्याआडून हे सर्व राजकीय मंडळीचे राजकारण सुरू असल्याची टीका केली.

 

 

Story img Loader