कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ९ कार्यकर्त्यांना शनिवारी वडगाव न्यायालयाने २ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तर, आश्वासन देऊन देखील अद्यापही उसाची बिले देण्यास मंजुरी न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून अटकेतील कार्यकर्ते उद्या रविवारी एक दिवसाचे अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे आज सांगण्यात आले.
मागील गळीत हंगामातील थकीत बिलापोटी ४०० रूपये द्या, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे बेंगलोर महामार्ग रोखला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी मध्यस्थी करून मागील गळीत हंगामातील १०० रूपये बिल देण्याचे जाहीर केले होते. . सदरची रक्कम दोन महिन्यात शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग करू साखर कारखान्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही सदरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट बनलेली आहे. तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी केली आहे. मुख्य सचिव यांच्याकडे ८ साखर कारखान्यांनी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र त्याला अजूनही सरकारने मंजुरी दिलेली नाही.
हेही वाचा >>>पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्यातील मतभेद पुन्हा ताणले
या मागणीसाठी हातकणंगले वडगाव रस्त्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी एकना़थ शिंदे यांना काल काळे झेंडे दाखवले. त्यानंतर रात्री उशीरा ९ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.मुख्यमंत्री शेतकर्यांची फसवणूक करत आहेत, याचा निषेध म्हणून पोलिस कोठडीतील ९ कार्यकर्ते रविवारी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. यामध्ये बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, स्वस्तिक पाटील, अक्षय देसाई, राजू गिड्ड, सुनिल खोत, दिपक चौगुले, महावीर चौगुले, श्रीकांत करके यांचा समावेश आहे.