कोल्हापूर : नृत्याचे ठुमके आणि राजकीय डायलॉग बाजीने अभिनेता गोविंदाने सोमवारी इचलकरंजीकरांची मने जिंकली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते.
गत दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि दोन वर्षात तिबल इंजिन सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने विकासकामे केली असून सर्वसामान्यांना न्याय दिला आहे. आजची मातृशक्तीची उपस्थिती पाहता धैर्यशील माने यांचा विजय म्हणजे मोदींचा विजय आहे, असा विश्वास सिनेअभिनेता माजी खासदार गोविंदा यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा
अध्यक्षीय भाषणात आमदार प्रकाश आवाडे यांनी, अब की बार चारशे पार जायचे असून धैर्यशील माने यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत मिळणार आहे. इचलकरंजीत महिला बचत गटाच्या माध्यमातून लखपती दिदींची संख्या लक्षणीय आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि महिला सक्षमीकरणातून त्यांना उद्योजिका बनविले आहे. आता गारमेंट सिटीवरुन इचलकरंजीत थेट साडी उत्पादन आणि कपड्यांपासून बाहुल्या तयार करण्याचा उद्योग सुरु करण्याचा मानस आहे. या माध्यमातून महिलांना कोट्यवधीचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन त्यांना आर्थिक बळ दिले जाणार असल्याचे सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी, शहरातील जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नासह सर्वच प्रलंबित सोडवायचे आहेत. त्यासाठी धैर्यशील माने यांना मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करुन मतदारसंघात विकासाची गंगा आणूया. त्यासाठी सर्वांनी न चुकता मतदान करुन पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. शिवसेनेच्या उपनेत्या शितल म्हात्रे यांनी, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना मोदींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी धैर्यशील माने यांना दिल्लीला पाठवूया. आज इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मातृशक्ती पाहता माने यांचा विजय निश्चित आहे, असे सांगितले.
हेही वाचा…जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वागत महिला आघाडीच्या को-ऑर्डीनेटर मौश्मी आवाडे यांनी तर प्रास्ताविक ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी केले. याप्रसंगी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. उर्मिला गायकवाड, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, शिवसेनेच्या उपनेत्या शितल म्हात्रे, अहदम मुजावर आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन सौ. अंजली बावणे यांनी केले. आभार महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नजमा शेख यांनी मानले.
याप्रसंगी सपना भिसे, सीमा कमते, मेघा माने, मंगल सुर्वे, अर्चना कुडचे, शबाना शिकलगार, अंजुम मुल्ला, प्रकाश मोरे, सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, प्रकाश पाटील, श्रीरंग खवरे, नरसिंह पारीक, सतिश मुळीक, राजू बोंद्रे, नितेश पोवार आदींसह विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.