लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शिरोळ येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने तयार होणे आवश्यक आहे. या तालुका क्रीडा संकुलासाठी असणारी पाच कोटीची निधीची मर्यादा वाढवून विशेष बाब म्हणून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी दिली.
पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, यड्राव येथील रस्ते कामाचा शुभारंभ मंत्री बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील- यड्रावकर,सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उद्योजक एस. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते. पार्वतीचे संचालक अजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.
आणखी वाचा-मराठा आरक्षणाबाबतची संभ्रमावस्था शासनाने दूर करणे गरजेचे – सतेज पाटील
मंत्री बनसोडे यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील विस्तारीत बसस्थानकाचे भूमिपूजन झाले. संजय पाटील- यड्रावकर, विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, यशवंत कानतोडे, विमनोज लिंग्रस,नामदेव पतंगे उपस्थित होते.
क्रिकेटचा आनंद
जयसिंगपूर येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू स्टेडियमला क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी भेट देऊन क्रिकेटचा आनंद घेतला. त्यांनी उत्तम फलंदाजी तर केलीच शिवाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे फलंदाजी करीत असताना यष्टीरक्षणही केले.