लोकांना १०० मीटर अंतरावर येण्यास मज्जाव
कोल्हापूर : Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कलाप्रेमी कोल्हापूरकरांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाट्यगृहाच्या पुनरउभारणीसाठी अनेकांनी मदतीची तयारी दर्शविली आहे. तर दुसरीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती कोल्हापूर प्रशासनाला वाटत आहे. यातूनच मध्यरात्री नाट्यगृहच्या शंभर मीटर अंतरात सामान्य लोकांना( अशासकीय लोकांना) येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. करवीर प्रांत अधिकारी यांनी तसा आदेश काढला आहे.
हेही वाचा >>> केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यातील नामांकित रंगकर्मींची तयारी; अनेकांच्या मदतीचे हात पुढे
परिस्थितीचे गंभीर लक्षात घेऊन त्यांनी पोलीस अधीक्षकांना या परिसरात पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा असे कळवले आहे. तर कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना लोखंडी कठिले लावून हा मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. ती शर्तीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. या दुर्घटनमुळे कोल्हापूरकरांना अतिवदुःख झाले आहे. समाज माध्यमात त्याचे दर्शन उमटत आहे. या नाट्यगृहाला उभारणी देण्यासाठी पुढे येण्याची तयारी अनेक जणांनी दर्शवली आहे.
पण आता नाट्यगृहाचे पेटलेले निखारे कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाच्या हालचाली त्या दृष्टीने दिसत आहेत. प्रशासनाला त्याची भीती वाटत आहे. जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शंभर मीटर अंतरात येण्यास अशासकीय ( सामान्य) लोकांना मज्जाव करणारा आदेश करवीर प्रांताधिकारी यांनी मध्यरात्री उशिरा काढला आहे.
विशाळगडवेळी तत्परता कोठे होती? आता यावर कशाप्रकारे प्रतिक्रिया उमटतात याकडे लक्ष वेधले आहे.विशाळगड अतिक्रमण आंदोलनावेळी समाज माध्यमातून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता काय होणार हे सामान्य लोकांना समजत होते. पण तेव्हा मात्र या परिसरात पुरेसा बंदोबस्त ठेवलेलस नव्हता. तेव्हा या परिसरात हिंसक घटना घडल्या होत्या. त्यावर उच्च न्यायालयानेही ताशेरे मारले होते. पण आता मात्र महसूल यंत्रणा अगदीच सतर्क झाल्याचे दिसत आहे.