कोपलेल्या सूर्यनारायणाची प्रखरता अंमळ कमी झाली असताना  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आता लोकांना वाढत्या उष्म्यात खबरदारी घेण्याचे उपाय कोणते यावर प्रबोधन सुरू केले आहे. मार्च, एप्रिल हे दोन्ही पूर्ण महिने आणि मे मधील ३ आठवडे हे नागरिकांना तप्त उन्हाळ्यामुळे नकोसे झाले होते. तेव्हा वाढत्या उष्म्यात कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याची माहिती देणे अधिक सयुक्तिक ठरले असते. पण बल गेला.. या म्हण प्रमाणे प्रशासनाला आता जाग आली आहे. शुक्रवारी एका पत्रकाद्वारे या विभागाने लोकांना वाढत्या उन्हापासून सजग कसे राहावे, याविषयी कळवले आहे. पारा ५-६ अंशाने कमी होऊन वारे वाहू लागले असताना या सल्ल्याची उपयुक्तता किती, असा प्रश्न निर्माण होत आहे .

मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली उष्णतेची तीव्रता या उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी  काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर.बग्रे यांनी केले आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची, मृत्यू ओढविण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सूचित केले आहे.

गरीब, श्रमिक यांचे काय?

प्रसासनाने केलेल्या सूचना योग्य असल्या तरी त्या गरीब, श्रमिक यांच्या खिशाला  परवडणाऱ्या आहेत का, याचा फारसा विचार केल्याचे जाणवत नाही. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, हॅट, बूटचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करताना हॅट, छत्रीचा वापर करावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने लस्सी, तोरणी, िलबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करावा, या सूचनांचे पालन रस्त्यावर काम करणारा सामान्य श्रमिक कसा करणार हा प्रश्न आहे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करा, हा सल्ला दिवसभर काम करणारा कामगार, शेतमजूर  कसा अमलात आणणार हे मात्र अनुत्तरित आहे.

Story img Loader