कोल्हापूर : जयसिंगपूर येथील क्रांती चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणी साठी सुरू असलेले आंदोलन आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मागे घेण्यात आले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला प्रस्ताव आंदोलकांनी बुधवारी मान्य केला. यामुळे या प्रश्नावरील ताणलेले आंदोलन आणि तणाव दूर झाला डॅा. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूरात रमेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरु केले होते.
यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिनिधी म्हणून माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करतांना सर्वमान्य तोडगा काढला. लिंबूसरबत देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, मिलिंद शिंदे,ॲड. संभाजीराजे नाईक उपस्थित होते. नवा प्रस्ताव याप्रमाणे आंदोलकांच्या मागणीप्रमाणे सि.स.नं.१२५१ या न्यायालयाच्या ताब्यात असलेल्या जागेमध्ये डॅा.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील.जयसिंगपूर नगरपरिषदेने ठराव दिल्या प्रमाणे बसस्थानकात आंबेडकर पुतळा उभारणी केली जाईल.