कोल्हापूर : इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारत येत्या दोन महिन्यांत साध्य करेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली आहे. या घोषणेचे लगोलग साखर उद्योगातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. देशातील साखर उद्योगासाठी हा निर्णय नवी दिशा देणारा ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील साखर उद्योग अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणीत आला आहे. यावर मार्ग म्हणून केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले. यासाठी कारखान्यांना अल्प व्याजदराने अर्थसहाय्य केले. खेरीज, इथेनॉल पुरवठा केल्यानंतर त्याची देयके २१ दिवसांमध्ये कारखान्यांना मिळू लागल्याने कारखान्यांवरील आर्थिक बोजा काही अंशाने हलका झाला. मात्र, या इंधनाची मागणी वाढण्यासाठी त्याचे इंधनात २० टक्के मिश्रणाचे धोरण अद्याप शंभर टक्के राबवले जात नव्हते. हे राबवले जावे, अशी मागणी देशांतर्गत साखर उद्योगातून होत होती.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

देशांतर्गत इथेनॉल निर्मिती अधिकाधिक वाढावी आणि त्याचा वापर इंधनात जास्तीत जास्त व्हावा, ही भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने मांडली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या साखर परिषदेत त्यांनी ही भूमिका अधोरेखित करताना देशात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत गाठणार असल्याचे नमूद केले होते. आज त्यांनी हे उद्दिष्ट येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. गडकरी यांच्या घोषणेचे साखर उद्योगातून लगोलग जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

शेअर बाजार वधारला

नितीन गडकरी यांच्या या घोषणेपाठोपाठ साखर उद्योगात गोडवा आल्याचे दिसून आले. श्री रेणुका शुगर्स, दालमिया भारत, बजाज हिंदुस्थान शुगर्स, प्राज इंडस्ट्रीज, द्वारकेस शुगर्स आदी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आज चांगलीच वाढ झाली.

परकीय चलनात बचत

पर्यावरणपूरक इंधन असलेल्या इथेनॉल निर्मितीमुळे पेट्रोल किंवा कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली. २०२२-२३ हंगामात ५०२ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊन २४ हजार ३०० कोटी रुपये परदेशी चलनाची बचत झाली होती, असे उत्तर केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभेमध्ये दिले होते.

इथेनॉल निर्मिती किती ?

सन २०१४ मध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १.५३ टक्के होते. ते २०२४ मध्ये १५ टक्के वाढले. नोव्हेंबर २०२३ मध्ये देशात १३७० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. २०२५ पर्यंत १७०० कोटी लिटर निर्मिती होणार आहे. यातून कारखान्यांना पैसे मिळाल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या गेल्या दोन वर्षांची उसाची थकबाकी भागवता आली होती. गेल्या दहा वर्षात कारखान्यांनी इथेनॉल विक्रीतून ९४ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे.

हेही वाचा – Ashish Shelar : “अतिशय भितीदायक घटना, आरोपीच्या शोधासाठी…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेबाबत आशिष शेलारांची महत्वाची माहिती

स्वागत आणि अपेक्षा

इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याची भूमिका विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी घेतल्याने हा टप्पा गाठता आल्याने साखर कारखानदार प्रतिनिधी म्हणून याचा निश्चितच आनंद होतो आहे. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्यामुळेच साखर उद्योगाचे डोक्यावरील आर्थिक ओझे खांद्यावर आले आहे. तथापि, केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीचे धोरण शाश्वत, अविचल आणि आश्वासक असले पाहिजे. गतवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर इथेनॉल निर्मितीवर निर्बंध लादले होते. आताही मक्यापासून इथेनॉल निर्मितीचे धोरण घेतल्याने त्याचे अन्नधान्य टंचाईवर परिणाम होणार आहेत. इथेनॉल खरेदी दरात वाढ करण्याच्या जुन्या मागणीवर लवकर निर्णय घेतला पाहिजे. – पी. आर. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aim for a twenty percent ethanol blend within the next two months nitin gadkari announcement ssb