कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाढती धूळ, हवेचा खराब होत चाललेला दर्जा याविरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने प्रशासनाने जल फवारणी (वॉटर स्प्रिंकलर) टँकरद्वारे मुख्य रस्त्यांची स्वच्छता केली. महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर स्प्रिंकलर टँकर महानगरपालिकेने खरेदी केला आहे.
या टँकरद्वारे विविध प्रकारे रस्ता स्वच्छता व पाणी फवारणी करता येते. हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी या मशिनद्वारे हवेत पाण्याने फॉगिंग करणे, रस्त्यावरील धुलीतन कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, रस्ते स्पिंकलद्वारे धुणे, डिव्हायडर धुणे, डिव्हायडर मधील झाडांना पाणी देणे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर फायटिंगसाठी सुद्धा या गाडीचा वापर करता येणे शक्य आहे. पण, या यंत्रणेचा वापर करण्यात येत नव्हता. याप्रश्नी नागरिकांच्या तक्रारीत भर पडू लागली आहे. यामुळे या गाडीचा आजपासून शहरातील मुख्य रस्त्यावर वापर सुरू करण्यात आला आहे. सकाळी ताराराणी चौक ते शाहू टोल नाका, ताराराणी चौक ते एस.पी.ऑफीस चौक या मुख्य मार्गावर या गाडीची चाचणी घेण्यात आली आहे. यानंतर तावडे हॉटेल ते ताराराणी चौक ते व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक ते सीपीआर चौक व फुलेवाडी रिंग रोड या प्रमुख मार्गावर या गाडीद्वारे वॉटर स्प्रिंकलर करण्यात आले.
या गाडीचा दैनंदिन वापर जेथे मोठ्या प्रमाणात धुलीकन हवेत आहेत व जिथे जास्त प्रमाणात वाहतूक आहे अशा ठिकाणी वापर करून शहरातील प्रदूषण कमी करण्यात येणार आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आतापर्यंत हवेतील धुलीकन कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत नवीन रस्ते करणे, उद्यान विकसित करणे, वृक्षारोपन, गॅस दाहिनी विकसित करणे, सीएनजी टिप्पर खरेदी करणे अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या आहेत.