जनतेतून थेट सरपंच निवडल्याने अनेकदा गोंधळ होतो. सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य हे वेगळ्या विचाराचे असले की ते एकमेकांच्या निर्णयाला विरोध करतात. या भांडणातून ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो. तुम्ही जर सरपंच थेट जनतेतून निवडून देणार असाल, तर नगराध्यक्ष, महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतून व्हावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये आज अजित पवारांच्या हस्ते नवनियुक्त सरपंचांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
“तुम्हाला नवीन संधी मिळाली आहे. तुम्ही थेट लोकांमधून निवडून आला आहात. ज्यावेळी थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा ठराव झाला, तेव्हा आम्ही त्याला विरोध केला होता. जर तुम्ही सरपंच थेट जनतेतून निवडून देणार असाल तर नगराध्यक्ष, महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड सुद्धा जनतेतून व्हावी, एका ठिकाणी एक पद्धत आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरी पद्धत हे योग्य नाही, अशी आमची भूमिका होती”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“जनतेतून थेट सरपंच निवडल्याने अनेकदा गोंधळ होतो. सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य हे वेगळ्या विचाराचे असले की ते एकमेकांच्या निर्णयाला विरोध करतात. या भांडणातून ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो. त्यामुळे माझी सरपंचांना विनंती आहे, की त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. त्यातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, असेही ते म्हणाले.
“तुम्ही आता सरपंच म्हणून निवडून आला आहात. काही जण ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आला आहात. त्यामुळे आता तुम्ही गावाचे कारभारी झाला आहात. तुम्ही आता गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे. जिल्हापरिषद, आमदार खासदार निधी आदीच्या माध्यमांतून गावाच्या विकासावर भर दिला पाहिजे”, असा सल्लाही त्यांनी नवनियुक्त सरपंचांना दिला.