कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राधानगरी – भुदरगड मतदारसंघात नवनवी धक्कादायक समीकरणे आतापासूनच पुढे येऊ लागली आहेत. शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात सध्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांची लढत निश्चित असली तरी ते कोणता झेंडा घेऊन लढणार यावर बरेच काही अवलंबून आहे. पाटील यांचा कल महाविकास आघाडीकडे असून त्यांचे त्यांचे मेहुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी काँग्रेसशी जवळीक वाढवली असून तेही लढणार असल्याने गुंतागुंत वाढली आहे.
सध्या येथे प्रत्येकी दोनदा विजयी झालेले के. पी. पाटील, बजरंग देसाई, आबिटकर यांचा प्रभाव असून अन्य काही माजी आमदारांचे गट सक्रिय आहेत. गेल्या दोन निवडणुकीत आबिटकर यांनी के. पी. पाटील यांचा पराभव केला आहे. आता पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आला. आबिटकर यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, के. पी. यांचे मेव्हणे ए. वाय. पाटील यांच्यासह अनेकांना आपल्या छावणीत ओढले होते. तरीही पाटील यांनी हसन मुश्रीफ, सतेज पाटील या नेत्यांच्या मदतीने बिद्रीवर यशाचा झेंडा रोवून आबिटकर यांना धोबीपछाड दिली होती. या निवडणुकीत ए. वाय. पाटील पराभूत झाल्याने आजवर झाकून असलेली राजकीय ताकद स्पष्ट झाली. लोकसभा निवडणुकीवेळी शाहू महाराज यांना ए. वाय. पाटील यांनी पाठिंबा देऊन काँग्रेसशी सलगी वाढवली.
हेही वाचा >>> शक्तिपीठ महामार्ग बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका अयोग्य; मंत्र्यांना जिल्हा बंदी समन्वय समितीचा इशारा
लोकसभा निवडणुकीचे परिणाम
पाठोपाठ आता के. पी. पाटील यांचीही पावले हाताकडे वळणार का याची चर्चा आहे. महायुतीमध्ये विद्यमान आमदार निकषावर आबिटकर यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट असल्याने पाटील यांना बंडखोरी करावी लागेल. पाटील हे नेमकी कोणती भूमिका घेणार याला महत्त्व आले आहे. बिद्री कारखान्यासाठी त्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मोलाची मदत होत असते. त्यांच्यापासून बाजूला जायचे का ? हा कळीचा मुद्दा आहे. हसन – किसन जोडी दुभंगली तर होणाऱ्या राजकीय परिणामाची चर्चा आहे. याच संबंधातून के. पी. पाटील यांनी इच्छेला मुरड घालून महायुतीचा प्रचार केला. मात्र राधानगरी मतदारसंघात शाहू महाराज यांना मिळालेले ६० हजाराचे मताधिक्य पाहता के. पी. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका बजावली आहे हे स्पष्ट झाले आहे. हा निकाल विधानसभेसाठी आबिटकर यांना धडकी भरवणारा तर पाटील यांना दिलासा देणारा ठरला.
हेही वाचा >>> राजू शेट्टी पुन्हा सक्रिय; शाहू जयंतीदिनी कागल ते कोल्हापूर कैफियत पदयात्रा काढणार
जागावाटपावर निर्णय
राज्यात महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण दिसू लागले आहे. ही दिशा ओळखून केपी यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काँग्रेसकडन निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. तथापि, पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार की ठाकरे सेनेकडे हे स्पष्ट झाल्यावर पाटील हे मतदारसंघ ह्या पक्षाकडे जाईल त्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन रिंगणात उतरतील असे दिसत आहे.
बहुरंगी लढतीने चुरस एकूणच मतदारसंघात आबिटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेसह अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील अशी तुल्यबळ लढत तूर्तास दिसत आहे. याचबरोबर भाजपचे जिल्हाप्रमुख राहुल देसाई यांनीही विधानसभा मतदारसंघात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसी वातावरणात वाढलेले वडील बजरंग देसाई यांचा राजकीय वारसा पुढे दमदारपणे चालवण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने महायुती अंतर्गतही जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आतापासूनच हा मतदारसंघ राजकीय घडामोडीमुळे ढवळून निघाला आहे.