दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याच्या मुद्दय़ावरून कोल्हापुरातील सभेत अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच कोंडीत पकडले आहे. यामुळे राष्ट्रवादीतील काका -पुतण्यातील संघर्ष पुढच्या टप्प्यावर गेला आहे. शरद पवार यांनी फुटीरांवर टीका सुरू केली असताना आता अजित पवार यांनीही शड्डू ठोकला असल्याचे या सभेत दिसून आले. अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत वादाने उसळी घेतली आहे. शरद पवार यांनी येवला, बीड आणि कोल्हापूर येथे सभा घेऊन अनुक्रमे छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांचा परखड शब्दात समाचार घेतला होता.

अजित पवार यांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनीही दुसऱ्या गटावर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे.  बीड नंतर कोल्हापुरातील सभेत अजित पवार यांच्यापासून अन्य नेत्यांच्या आक्रमक बाणा दिसून आला. टीका करणाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेण्यात आला. राष्ट्रवादीमध्ये वादाचा मुख्य मुद्दा आहे तो भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत. शरद पवार यांनी भाजप सोबत सत्तेत जाणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. हा मुद्दा त्यांनी कोल्हापुरातील सभेतही अधोरेखित केला होता. अजित पवार यांनी कालच्या सभेत हा विषय छेडला.  ठाकरे सरकार सत्तेतून बाहेर पडले तेव्हा महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीच्या एक-दोन आमदार वगळता सर्वानी सहीचे पत्र दिले होते.

हेही वाचा >>> दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

असा संदर्भ देऊन अजित पवार यांनी  हे जर खरं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. पण खरे असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? असा सवाल करताना रोख शरद पवार यांच्या दिशेने ठेवला. शरद पवार यांच्यावर टीका करायची नाही असे एकीकडे अजित पवार म्हणत असले तरी दुसरीकडे मात्र ते पवार यांना खिंडीत कसे पकडता येईल याचे डावपेच कसे टाकीत आहेत हेच त्यांच्या या विधानातून दिसून आले. या पद्धतीने पुतण्याने काकांना अडचणीत टाकले असताना शरद पवार यांच्या समर्थकांकडून याबाबत कोणते उत्तर दिले जाणार याला सत्ताकारणाच्या दृष्टीने महत्त्व आले आहे.

अजितदादांचा दावा

 महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याची कारणमीमांसा अजित पवार कालच्या सभेत वारंवार करावी लागली. सत्ता, स्वार्थ यासाठी नव्हे तर तर विकासाची कामे मार्गी लागावी, आमदारांना निधी मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे पवारांना पुन:पुन्हा सांगावे लागले. यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याची घटना आणि त्यावर एस. एम. जोशी यांनी उपस्थित केलेला प्रश्न याचा संदर्भातील देत अजितदादांनी आपण यशवंतराव चव्हाण यांचेच अनुकरण करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अर्थात सत्तेत सहभागी झाल्याने अजितदादा गटातील अनेकांच्या ईडी आदी चौकशी थांबण्याचा मुद्दा संबंधित आमदारांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पण त्याला मात्र त्यांनी स्पर्श करण्याचे जाणीवपूर्वक टाळत विकासाची शर्करावगुंठीत गोळी पक्षीय आरोग्यासाठी कशी चांगले आहे, हे कसोशीने पटवून द्यावे लागले. 

भुजबळांचा नरमलेला सूर

 येवल्यामध्ये शरद पवार यांनी टीका केल्यानंतर त्याला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी  बीडच्या सभेत २००३ साली गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला. माझी काही चूक होती? ,अशी आव्हानात्मक विचारणा शरद पवार यांना केली होती. कोल्हापुरात आल्यावर मात्र त्यांचा सूर बराचसा नरमला असल्याचे दिसले.  बीडमध्ये जे बोललो ते चुकीचे काहीच नव्हते. फक्त माझे दु:ख व्यक्त केले. मी शरद पवार यांच्यावर काही टीका केली नव्हती, असा खुलासा करीत भुजबळ यांनी पवारांवर टीका करण्याचे टाळले.अन्य वक्त्यांनीही शरद पवार यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला नाही.

मुश्रीफांनी टीका टाळली

अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेचे दणकेबाज नियोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. तीन आठवडय़ांपूर्वी शरद पवार यांनी मुश्रीफ यांना  ईडी कारवाई, सत्ता सहभाग यावरून डिवचले होते. तर,आमदार रोहित पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांच्या त्रासामुळे उद्योजक स्थलांतराच्या मानसिकतेत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. पण मुश्रीफ यांनी संयम राखत आणि जुन्या निष्ठेचे स्मरण करीत शरद पवार, रोहित पवार यांच्यासह कोणावरही टीका करण्याचा मोह टाळला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar kolhapur meeting criticism to sharad pawar ysh
Show comments