कोल्हापूर : शिरोळ नगरपालिकेतील पाणी योजनेचे काम रेंगाळल्याने सर्वपक्षीयांनी नगरपालिकेसमोर आंदोलन केले. याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी दिले. तर कामात सुधारणा झाली नाही तर मंगळवारपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शिरोळ शहरासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत २६ कोटी ६८ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. हे काम ईगल इंडिया उल्हासनगर या ठेकेदार कंपनीला एक टक्का जादा दराने देण्यात आले आहे. योजनेच्या कामाची मुदत संपली तरीही काम रेंगाळलेले आहे. परिणामी कृष्णाकाठी असूनही शिरोळकरांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी युवा नेते पृथ्वीराज यादव, दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी सरपंच गजानन संकपाळ आदींनी हे आंदोलन केले.