कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कोल्हापूर भेटीवेळी सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, यामध्ये भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले समरजित घाटगे यांची भेट उल्लेखनीय ठरली.
मंत्री गडकरी हे येथे एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. कोल्हापुरात आल्यानंतर ते नवीन राजवाड्यामध्ये भेटीसाठी गेले होते. तेथे आधीपासूनच खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, समरजित घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मालोजीराजे छत्रपती आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
गडकरी – घाटगे जवळीक
गडकरी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केले. तर समरजित घाटगे यांच्या नावाचा उच्चार करीत गडकरी यांनी काय, कसे चालले आहे? अशी विचारणा केली. त्यातून गडकरी – घाटगे यांच्यातील जवळीक दिसून आली. पाठोपाठ मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आले. या सर्वांनी बंद कक्षात एकत्र येऊन गप्पा, चहापान केले.
भाजप प्रवेश चर्चा
यावेळी घाटगे यांनी मंत्री पाटील, खासदार महाडिक यांच्याशी संवाद साधला. घाटगे हे पुन्हा भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना राजकीय दृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.