नवरात्र-दसरा उत्सवातून निवांत क्षण अनुभवणाऱ्या मतदारांना वेढण्यासाठी राजकीय पक्षांनी रविवारी प्रचाराची राळ उठवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी राज्य पातळीवरील दिग्गजांच्या सभा, प्रचारयात्रा, संपर्कभेटी याचे भक्कम नियोजन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत आदी प्रमुख सुटीच्या दिवशी प्रचारात उतरणार आहेत.
महापालिका निवडणुकीला सुरुवात झाली तेव्हा पितृपक्ष सुरू असल्याने प्रचाराला गती देता आली नाही. त्यानंतर घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत नागरिक उत्सवात दंग होते. अद्याप दिवाळीसाठी वीस दिवसांचा अवधी आहे. तर या कालावधीत रविवारच्या सुटीचे दोन दिवस मिळणार आहेत. त्यातील पहिला रविवार उद्या (२५ ऑक्टोबर) आहे. ही संधी साधत राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केले आहे. मतदारांना आकर्षति करण्यासाठी बडय़ा नेत्यांना पाचारण केले आहे.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दुपारी ३ वाजता करवीरनगरीत येणार आहेत. शिवसेनेच्या वचननाम्याचे प्रकाशन, पत्रकार परिषद आटोपून ते करवीरनगरीत रोड शोसाठी उतरणार आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात आल्याने युवा सनिकांत उत्साहाचे वातावरण आहे. तसेच सेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याही विविध ठिकाणी सभा होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची सायंकाळी प्रायव्हेट हायस्कूल मदानात जाहीर सभा होणार आहे. त्याची जोरदार तयारी पक्षाच्या वतीने करण्यात आली असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे हे रविवारी सायंकाळी तीन ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचाराच्या सभा घेणार आहेत. तर सोमवारी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, गुरुवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सभा होणार आहेत.