महापालिका निवडणुकीचा निकाल घोषित होण्यास सोमवारी अकरा वाजणार असले, तरी रविवारी मतदान सुरु असतानाच सत्तेचे डोहाळे लागलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपणच सत्तेमध्ये स्वबळावर येऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. मतदार केंद्रांवर फेरफटका मारल्यानंतर उमेदवार, समर्थक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहून नेते सुखावले असून त्यांच्याकडून हवेत राहणारा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यातून राज्याच्या सत्तेत एकत्रित असणाऱ्या भाजपाचे मंत्री व शिवसेनेचे आमदार यांच्यात कलगी तुरा रंगला. नेते मंडळींचा अंदाज सत्तासोपानापर्यंत पोचण्यासाठी कितपत उपयुक्त ठरतो, हे उद्या (सोमवारी) स्पष्ट होणार असून तोपर्यंत या नेत्यांना खुशीची गाजरे खावी लागणार आहेत.
महापालिकेच्या आखाडय़ामध्ये यंदा बहुरंगी सामना आहे. केंद्र व राज्याच्या सत्तेत आलेल्या भाजपाने महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी स्थानिक ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली आहे. तर महापालिकेत गेली पाच वष्रे सत्तेमध्ये नांदणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी काडीमोड घेत स्वतंत्रपणे िरगणात उडी घेतली आहे. तर शिवसेनेनेही स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. डावे पक्ष, क्षीण ताकदीच्या स्थानिक आघाडय़ा व अपक्ष यांनीही आखाडय़ात शड्ड ठोकला आहे. पण मुख्य सामना आहे तो भाजप-ताराराणी आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांच्यामध्ये.
या चारही पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींनी रविवारी दिवसभर शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेटी दिल्या. उमेदवार, कार्यकत्रे यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे नेत्यांचा चेहरा फुलला होता. आपलाच उमेदवार निवडून येणार याचा अंदाज आल्याने नेत्यांची छाती फुगली होती. त्यातून महापालिकेत आपल्या पक्षाचा झेंडा लागेल आणि तोही स्वबळावर, याचा दावा मतदार सुरु असतानाच केला गेला. त्यातून भाजप-सेनेच्या नेत्यांमध्येही कलगी तुरा रंगला.
सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदार ज्या प्रचंड उत्साहाने बाहेर पडले आहेत ते पाहता भाजप-आघाडीला ४५ जागा मिळतील. मतदानाचा टक्का वाढल्यास ५० जागांपर्यंत सहज पोचू, असा विश्वास व्यक्त केला. आम्हांला बहुमत मिळणार असले तरी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करु, असे म्हणत त्यांनी सेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केला. तर, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना स्वबळावर सत्तेत येणार असल्याची खात्री व्यक्त करीत मंत्री पाटील यांना शिवसेनेची मदत मिळेल, असा विश्वास कोणी दिला. त्यांनी इतक्यात हवेत राहू नयेत, असा टोला लगावला.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केंद्र व राज्यातील भाजपाची कामगिरी सुमार दर्जाची ठरली असल्याने मतदारांनी या पक्षाला धडा शिकवण्याच्या उद्देशाने मतदान केंद्रांमध्ये रांगा लागल्या असल्याचा उल्लेख करुन आपलाच पक्ष स्पष्टपणे बहुमत मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापुरातील नेत्यांनी केले स्वबळ सत्तेचे दावे
सत्तेचे डोहाळे लागलेल्या सर्वच राजकीय पक्षांना आपणच सत्तेमध्ये स्वबळावर येऊ असा विश्वास
Written by अपर्णा देगावकर
First published on: 02-11-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All political parties hope come to power on its own