कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगिण विकासाच्या गप्पा मारणार्या खासदार आणि आमदारांनी शहरातील कार्यक्षम अधिकार्यांच्या बदल्यांचा खेळखंडोबा लावला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांची तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ओमप्रकाश दिवटे यांची बदली केली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी बेकायदेशीर कामांना विरोध करणार्या अधिकार्यांच्या बदल्यांचे वास्तव चित्र जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्याचे उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके व प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.अकरा महिन्यांपूर्वी महापालिकेत आयुक्त म्हणून आलेल्या ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शहराचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या काही कामांना त्यांनी स्पष्टपणे नकार दर्शविल्याने त्यांच्या बदलीचा घाट आवाडेंनी घातला होता.
महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे अचानक बदली होऊन त्या ठिकाणी सातारा येथील पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली होती. दिवटे यांनी मॅट मध्ये धाव घेतल्यानंतर त्यांना या पदावर कायम ठेवले आहे . तर पाटील यांना पुन्हा सातारा येथे जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता इचलकरंजीत राजकीय टिपा-टिपणीला सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना चाळके, मोरबाळे म्हणाले,कोल्हापूर रोडवरील यशवंत प्रोसेसच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या दुकानगाळ्यांसमोरील झाडे तोडण्यासाठी आमदार आवाडे हे आयुक्तांवर दबाव टाकत होते. त्यांना आयुक्तांनी नकार दिल्याने दुखावलेल्या आमदार पिता-पुत्रांनी दिवटे यांची बदली केल्याचा आरोप चाळके यांनी केला. पहिले आयुक्त देशमुख यांच्याशी बिनसल्याने खासदार माने यांनी त्यांची बदली केली. तर बेकायदेशीर कामांना नकार देणार्या दिवटे यांची बदली आमदार आवाडे यांनी केली.
हेही वाचा >>>ओमप्रकाश दिवटे हेच इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त; पल्लवी पाटील यांच्या निवडीला स्थगिती
एकिकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे कार्यक्षम अधिकार्यांच्या बदल्या करुन मर्जीतील अधिकार्यांना आणायचे हे बरोबर नाही. गेल्या पाच वर्षात इचलकरंजीतील एकही प्रश्न सुटलेला नाही. शहराचा पाण्याचा व वस्त्रोद्योगाचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. या प्रश्नांवर आमदार आवाडे केवळ इचलकरंजीकरांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. या प्रश्नांवर आम्ही स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही चाळके यांनी सांगितले. शहरातील पाण्याचा प्रश्न जटील बनला असताना तो सोडविण्यासाठी बैठक घेण्याऐवजी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात गुंतले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तर दिवटे हे मॅटमध्ये गेले असून त्यांच्या बाजूने निकाल लागावा म्हणजे अशा प्रवृत्तींना चपराक बसेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>आमिर खानचा मुलगा प्रदर्शनापूर्वी गाजू लागला; ‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन
यशवंत प्रोसेस परिसरात उभारले जात असलेले दुकानगाळे हे बेकायदेशीर आहेत. औद्योगिक क्षेत्र असताना व्यापारी संकुल उभारताना त्यांनी रितसर परवानगी घेतली आहे का? याची तक्रार महापालिकेकडे केली असल्याचे मोरबाळे यांनी सांगितले. तर आगामी विधानसभा निवडणूकीत जनताच आवाडे यांना त्यांची जागा दाखवून देईल असेही ते म्हणाले.