चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत आणि विनय कोरे यांची कोंडी
कोल्हापूर : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांना युतीच्या माध्यमातून एकत्रित सामोरे जाण्याच्या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अधिक लाभ होणार आहे, तर भाजपाला पदरी जागा कमी आल्याने मित्रपक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे.
गेली दोनतीन वर्षे कोल्हापुरात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षात सतत काही ना काही कारणावरून संघर्ष होत होता पालकमंत्री पाटील आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील वाद भलताच गाजला. आता युतीचा निर्णय झाल्याने हे नेते गळ्यात गळे घालण्यास तयार झाले आहेत. युतीचा अधिक लाभ शिवसेनेला होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेकडे अधिक प्रतिनिधित्व
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे येथे अनुक्रमे संजय मंडलिक हे खासदार धनंजय महाडिक यांच्या तर धैर्यशील माने हे खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढतील. पालकमंत्री पाटील यांचा कल खासदार महाडिक यांच्या बाजूने असला, तरी ते युतीधर्म किती पाळतात यावर सेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. शेट्टी विरोधात जोरदार आवाज उठवणारे सदाभाऊ खोत यांना युतीमुळे तलवार म्यान करावी लागणार असे दिसत आहे. विधानसभेत शिवसेनेचे सहा आमदार आहेत शिवाय अन्य दोन मतदारसंघ त्यांच्याकडे असल्याने भाजपाला विस्ताराची संधी कमी असून त्यांना येथेही शिवसेनेच्या प्रचाराची धुरा वाहावी लागणार आहे. भाजपाचे दोन आमदार असल्याने शिवसेनेची मित्रपक्षाला साथ देण्याची जबाबदारी कमी पेलावी लागणार आहे.
विनय कोरे आज मुख्यमंत्र्याच्या भेटीला
एके काळी चार आमदार-एक मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांची युतीच्या निर्णयाने कोंडी झाली आहे. कोरे यांनी दोन वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊ न सहयोगी पक्ष बनण्याची भूमिका घेतली. कोरे यांच्या पन्हाळा तसेच त्यांचे सहकारी माजी आमदार राजीव आवळे यांच्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आल्याने युतीधर्मानुसार या जागा सेनेकडे जाणार हे उघड आहे त्यामुळे कोरे-आवळे यांना मतदारसंघ उरला नसल्याने ते राजकीय पेचात सापडले आहेत. भाजप मित्रपक्षांबाबत कोणती भूमिका घेणार हे समजून घेण्यासाठी कोरे उद्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात असून त्यानंतर ते आपली भूमिका निश्चित करणार आहेत.