इचलकरंजी शहरासाठीच्या महत्त्वाकांक्षी वारणा नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस अमृत अंतर्गत आज उच्चस्तरीय समितीने अंतिम मान्यता दिली. सन २०४९ मधील लोकसंख्येचा विचार करता, ८९ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता या प्रकल्पाद्वारे पूर्ण केली जाणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ७१ कोटी रुपये इतका आहे. या योजनेच्या कामास येत्या दोन महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे.
इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेचा मागील वर्षीच्या अमृत आराखडय़ात समावेश करण्यात आला आहे. नद्यांवरील पाणी उपसा योजना करण्याचे शासनाचे धोरण नसतानासुध्दा व त्यासाठी कमी कालावधी शिल्लक असतानासुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रयत्न करून या योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. उपसा केंद्रापासून शहरातील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत १९.५० कि.मी. पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या योजनेतून दानोळी गावाजवळ नदी पात्रामध्ये २ कोटी खर्चाचा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे दानोळी गावासाठी जास्तीत जास्त पाणी अडविले जाणार आहे. तसेच या जलउपसा केंद्रासाठी एक्प्रेस फिडरमधून वीज पुरवठा केला जाणार असल्यामुळे दानोळीसाठी २४ तास वीज मिळणार आहे.
दानोळी गावाजवळून वारणा नदी वाहते. याचा अर्थ नदीची मालकी ग्रामस्थांची नाही. त्यामुळे दानोळीच्या विकासासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका सोडावी, असे आवाहन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrit water supply scheme approved for ichalkaranji city
Show comments