कोल्हापूर : अंधश्रद्धेतून तरुणाला ‘जोगता’ म्हणून सोडण्याचा प्रयत्न अंनिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. गडहिंग्लज तालुक्यात हा प्रकार घडला. पीडित तरुणाचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्याचा मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पीडित तरुणास गेली दोन वर्षे मानदुखीचा त्रास सुरू आहे. किरकोळ उपचार केल्याने तो कमी होत नव्हता. आजारपणातून बरे होण्यासाठी संबंधित कुटुंबाने देवऋषीचा सल्ला घेतला असता, त्याने तरुणाला यल्लमा देवीला जोगता म्हणून सोडण्याचा भलताच सल्ला दिला.
त्यानुसार तरुणास जोगता सोडण्याच्या विधिवत कार्यक्रमाची तयारी कुटुंबीयांनी सुरू केली होती. याची माहिती मिळताच अंनिस, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणून असा प्रकार करणे गुन्हा असल्याचे समजावून सांगतानाच चांगले वैद्यकीय उपचार करण्याबाबत, समुपदेशन करण्याबाबत सुचवले. यामुळे मुलाच्या वडिलांनीही हा प्रकार गैरसमज, अंधश्रद्धेतून झाल्याचे सांगत वादावर पडदा टाकला. देवदासी, जोगता प्रथा बंद करण्यासाठी राज्य शासनाने कायदे केले आहेत. तरीही विज्ञान युगात चुकीच्या माहितीवरून असे प्रकार घडतात, हे योग्य नाही, असे मत अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोईटे यांनी व्यक्त केले.